बैलगाडामालकांनी महामार्ग रोखला
By Admin | Published: January 30, 2017 02:47 AM2017-01-30T02:47:09+5:302017-01-30T02:47:09+5:30
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी आग्रही मागणी करीत बैलगाडामालकांनी मंचर शहरातून निषेध मोर्चा काढत पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रास्ता रोको केले
मंचर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी आग्रही मागणी करीत बैलगाडामालकांनी मंचर शहरातून निषेध मोर्चा काढत पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रास्ता रोको केले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षविरहित आंदोलन करून शर्यत तातडीने सुरू करा, अशी एकमुखाने मागणी केली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
आंबेगाव तालुक्यातील बैलगाडामालक रविवारी एकवटला होता. बैलगाडामालकांच्या आंदोलनासाठी जथ्थेच्या जथ्थे मंचरच्या दिशेने येत होते. शिवाजी चौकात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ््याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. बैलगाडा, बैलगाड्यांचे बैल घेऊन शेतकरी आले होते. घोषणांचे फलक हातात घेऊन तरुण, वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. हजारोंचा जमाव अत्यंत शिस्तीने मोर्चामध्ये सहभागी झाला होता. लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा एसटी बसस्थानकाजवळ आल्यावर त्याचे रूपांतर सभेत झाले. आंबेगाव तालुका बैलगाडा संघटनेने या आंदोलनाचे आयोजन केले होते.
या वेळी वळसे-पाटील, आढळराव पाटील यांच्यासह जयसिंग एरंडे, बाळासाहेब टेमगिरे, बाळासाहेब आरूडे, रामकृष्ण टाकळकर, विकास थोरात, स्नेहल पोखरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बैलगाडामालकांनी रस्त्यावर ठाण मांडले. बैलगाडा शर्यत सुरू करा, पेटा संस्थेवर बंदी आणा, अशा घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार यांना खासदार आढळराव पाटील, तसेच दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर काही क्षणात महामार्ग मोकळा करून देण्यात आल्याने वाहतूक लगेच सुरळीत झाली.
या आंदोलनात सहभागी झालेला बैलगाडा आकर्षणाचा विषय होता. अनेकांनी या बैलगाड्यासोबत फोटो काढून घेतले. विशाल तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. आंदोलनाचे नियोजन के. के. थोरात, सुहास बाणखेले, संतोष मोरडे, राजू आरूडे, दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, राजू निघोट, बाबू बोऱ्हाडे, मयूर वाबळे यांनी केले.