"मराठी माणसाचा घात करू नये..."; बेळगाव सीमावासियांचे संभाजीराजेंना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:16 PM2023-03-06T13:16:14+5:302023-03-06T13:16:51+5:30

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्याविरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला असं या पत्रात म्हटलं आहे.

Belgaum Maharashtra Ekikaran Samiti wrote a letter to former MP Chhatrapati Sambhaji Raje | "मराठी माणसाचा घात करू नये..."; बेळगाव सीमावासियांचे संभाजीराजेंना खरमरीत पत्र

"मराठी माणसाचा घात करू नये..."; बेळगाव सीमावासियांचे संभाजीराजेंना खरमरीत पत्र

googlenewsNext

बेळगाव - जिल्ह्यातील राजहंस गडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात हजेरी लावल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने छ. संभाजीराजेंना खरमरीत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नेत्यांनी हजेरी लावू नये असं आवाहन समितीने केले होते. तरीही काँग्रेस नेते सतेज पाटील, आमदार धीरज देशमुख यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थिती लावली. त्यावरून सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. 

महाराष्ट्र एकिकरण समितीने संभाजीराजेंना पाठवलेलं पत्र वाचा, जसच्या तसं...
 

मा. छत्रपती संभाजीराजे, 
कोल्हापूर
महोदय, आपण रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हजर झाला त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथं व्यक्त करत आहे. मराठी भाषेसाठी गेली ६६ वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्याकाठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंस गडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. 

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्याविरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला. प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न राहण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतींच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्यासोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार धीरज देशमुख यांनी जय कर्नाटक उद्धार काढले. 

आपण छत्रपतींचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास अपात्र ठरत आहात. मराठी माणसाच्या लढ्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही. पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावातील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतींच्या रयतेचा आहे. आपण त्यांचे पाईक मानले जाता तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे.

कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली. आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतींच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत. आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही आमच्यासोबत यावे ही श्रीचरणी प्रार्थना, कळावे

प्रकाश आप्पाजी मरगाळे
खजिनदार, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव

Web Title: Belgaum Maharashtra Ekikaran Samiti wrote a letter to former MP Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.