बेळगाव महापौर-उपहापौरांवर राजद्रोहाचा ठपका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2016 06:01 AM2016-11-07T06:01:22+5:302016-11-07T06:01:22+5:30
बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांना कर्नाटक शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर महापालिका बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांना कर्नाटक शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर महापालिका बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर, उपमहापौर यांना बजावलेल्या नोटिशीत राजद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागविला आहे.
‘काळा दिना’नंतर कर्नाटक सरकारने उत्तर कर्नाटक प्रादेशिक आयुक्तांकडून संपूर्ण घटनेचा अहवाल मागविला आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी न होता आपण ‘काळ्या दिना’च्या सायकल फेरीत सहभागी होऊन राजद्रोह केला आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कारवाई का केली जाऊ नये, तसेच महापालिका नियमित बैठका का घेतल्या नाहीत, अशी विचारणा महापौर-उपमहापौरांना दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीत करण्यात आली आहे.
‘काळा दिना’च्या सायकलफेरीत महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदेंसह एकूण २८ नगरसेवक सहभागी झाले होते. त्यापैकी ९ नगरसेवकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी कानडी संघटना करीत आहेत. राज्य सरकार फक्त महापौर, उपमहापौरांवर कारवाई करतील. अन्य ९ नगरसेवकांवर कारवाई करतील का, संपूर्ण महापालिकाच बरखास्त करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)