बेलवाडीत रंगला अश्व रिंगण सोहळा
By admin | Published: June 26, 2017 09:55 AM2017-06-26T09:55:35+5:302017-06-26T10:00:29+5:30
त तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
Next
ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. 26- देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या वारी सोहळ्यातील शिण घालवणारा, वारीमध्ये चालण्यासाठी बळ देणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदूंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचां दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो. भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा.. भक्तिने भरलेला रिंगण सोहळा पाहावा ह्याचि देही याचि डोळा अशा भक्तीभावाने जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यासह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारण फेडले.
सणसर येथील मुक्कामानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे विसावला. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्याचे रिंगण पार पडले. यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना सर्वचजण वयोभान विसरले होते. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकारामचा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. यावेळी अश्व पुढे जाताच त्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजन एकमेकाच्या पाया पडत होते. तत्पूर्वी , आमदार दत्तात्रय भरणे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, सरपंच शोभा गणगे, उपसरपंच अनिल खैरे, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागिय पोलिस अधिकारी बापू बांगर, तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, सहायक पोलिस निरिक्षक यु. डी. भजनावळे आदींनी पालखी रथाचे स्वागत केले. पालखी रिंगण सोहळ्यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.