आठजणांना जलसमाधी--विद्यार्थ्यांच्या मृत्यूने बेळगाव हळहळले

By Admin | Published: April 16, 2017 01:08 AM2017-04-16T01:08:04+5:302017-04-16T01:08:18+5:30

मालवणमधील दुर्घटना : मृतांत बेळगावच्या प्राध्यापकासह सात विद्यार्थी

Belgaum was heartbroken by the death of the students | आठजणांना जलसमाधी--विद्यार्थ्यांच्या मृत्यूने बेळगाव हळहळले

आठजणांना जलसमाधी--विद्यार्थ्यांच्या मृत्यूने बेळगाव हळहळले

googlenewsNext

मालवण/बेळगाव : बेळगाव येथून कोकण पर्यटनासाठी आलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकासह आठ विद्यार्थ्यांचा मालवण समुद्रात बुडून मृत्यू झाला. समुद्रस्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच समुद्रात भरती असल्याने पाण्याच्या प्रवाहात पर्यटक समुद्रात खेचले गेले. यात आठजणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्घटना वायरी शिवाजी पुतळ्यानजीकच्या तेली पाणंद समुद्रकिनारी शनिवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.
हे सर्व विद्यार्थी बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे असून, मृतांत एका प्राध्यापकासह चार विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. स्थानिक मच्छिमार व स्कुबा डायव्हर यांच्या प्रसंगावधानामुळे दोन विद्यार्थिनींसह एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले आहे. यातील एक विद्यार्थिनी गंभीर असल्याने प्राथमिक उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
एकाचवेळी बुडून आठजणांचा मृत्यू होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपर्क होऊ शकला नसल्याने स्थानिक मच्छिमारांनी खासगी गाड्यातून बुडालेल्या पर्यटकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दुर्घटना घडल्यानंतर सुमारे एक तासाने रुग्णवाहिका आल्याबाबत मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली. मालवण पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची वाट न पाहता अत्यवस्थ बनलेल्या पर्यटकांना आपल्या गाडीतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे ४७ विद्यार्थी दोन प्राध्यापकांसह कोकण दर्शन सहलीसाठी गुरुवारी बेळगाव येथून निघाले. त्यांनी पुणे येथील इंडस्ट्रियल प्रकल्पाला भेट दिली. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटन उरकून मालवणला ते शनिवारी सकाळी आले. सकाळच्या सत्रात फ्रेश झाल्यानंतर ते किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेऊन वायरीच्या दिशेने निघाले. वायरी येथील शिवाजी पुतळा बस थांब्यानजीक स्थानिकांना विचारणा करून त्यांनी खासगी आरामबस पार्क करून समुद्रस्नान करण्याचा निर्णय घेतला. समुद्रात भरती असल्याने व वारे वाहत असल्याने स्थानिक महिला तसेच मच्छिमारांनी त्यांना पाण्यात न जाण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यांनी स्थानिकांच्या सूचना झुगारून निष्काळजीपणे समुद्रस्नानासाठी सर्वजण आत उतरले. यावेळी ही दुर्घटना घडली. (प्रतिनिधी)


आपत्कालीन यंत्रणा ‘फेल’
पर्यटक बुडाल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला. मात्र, वेळेत रुग्णवाहिका न आल्याने पर्यटकांना प्राण गमवावा लागला. स्थानिकांनी बुडत्या पर्यटकांना जीव धोक्यात घालून शिताफीने समुद्राबाहेर काढल्यानंतर पर्यटक गंभीर अवस्थेत होते. मात्र, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी याबाबत तीव्र शब्दांत रोष व्यक्त करताना जीवरक्षक नेमले खरे पण त्यांना लागणारे आवश्यक साहित्याची पूर्तता झाली नाही, मग धोकादायक स्थितीत पर्यटकांचे जीव वाचवायचे कसे? असा सवाल करण्यात आला. जीवरक्षकांना लाईफ जॅकेट दिले म्हणजे पर्यटकांचे जीव वाचतील, असा प्रशासनाने समज करून घेऊ नये, अशीही भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.


अकरापैकी तिघांना वाचविले
समुद्रस्नानासाठी पाण्यात जवळपास ४७ विद्यार्थ्यांसह दोन प्राध्यापक उतरले होते. समुद्रात भरती असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात अकरा पर्यटक बुडू लागले. पर्यटकांच्या नाकातोंडात वाळू व पाणी गेल्याने त्यांचा जीव गुदमरला होता. सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक श्यामसुंदर सारंग, नारायण तोडणकर, प्रशांत साळगावकर, पांडू कुबल, योगेश जाधव, रामदास आचरेकर, जितू मयेकर, योगेश आचरेकर, अमित मायबा, दादा मायबा, देविदास घाडी, समीर पाटकर, चंदू खोबरेकर, लक्ष्मण मेस्त, सत्यवान भगत यांनी समुद्रात झेपावत सुरुवातीला पाच पर्यटकांना बाहेर काढले. त्यानंतर स्कुबा डायव्हर्सनी उर्वरित पर्यटकांना बाहेर काढले. यातील तीन पर्यटकांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले असून, दोघांची स्थिती स्थिर असून, गंभीर बनलेल्या युवतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मृतांची नावेमृतांमध्ये एका प्राध्यापकासह चार विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. यात प्राध्यापक महेश कुडुचकर (३५), विद्यार्थी नितीन मुनतवाडकर (२२), मुझमिल हन्नीकेरी (२२), किरण खांडेकर (२२), अवधूत ताशीलदार (२२), माया कोल्हे (२२), करुणा बेर्डे (२१), आरती चव्हाण (२२) यांचा समावेश आहे.


संकेत सुरेश गाडवी (२३), अनिता रामकृष्ण हानळी (२२), आकांक्षा घाटगे (२२) यांना वाचविण्यात यश आले असून, यातील आकांक्षा घाटगे हिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुर्घटनेच्या मानसिक धक्क्यामुळे प्राध्यापिका वैदेही देशपांडे व अश्विनी रविकांत हिरकोडी (२२) या अत्यवस्थ बनल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक सायंकाळी उशिरा मालवणात दाखल झाले होते. मृत घोषित झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ठेवण्यात आले होते.


विद्यार्थ्यांच्या मृत्यूने बेळगाव हळहळले
बेळगाव : मालवण येथील समुद्रात बुडून इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकासह आठजण मृत्युमुखी पडल्यामुळे बेळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कॉलेजकडून परवानगी न घेता विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक मालवणला गेल्याचा खुलासा मराठा मंडळच्या व्यवस्थापनाने केला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य उडुपी यांनी सदर सहल कॉलेजच्या परवानगीने नव्हती, अशी माहिती दिली आणि दुपारीच संचालक प्रताप यादव आणि लक्ष्मण झनगरूचे हे मालवणला रवाना झाले.
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे विद्यार्थी पुण्याला स्टडी टूरसाठी बेळगावहून बारा तारखेला गेले होते. पुण्याहून ते लवासा, रायगड, महाबळेश्वर करून शनिवारी सकाळी मालवणला पोहोचले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी फोन करून आपण मालवणला पोहोचलो असून, दुपारी दोन वाजता मालवणहून निघून बेळगावला येणार असल्याचे कळविले होते; पण काही वेळातच वायरी समुद्रकिनाऱ्यावर कॉलेजचे आठ विद्यार्थी समुद्रात बुडून मृत झाल्याची बातमी प्रसारमाध्यमातून लागल्यावर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हृदयाचे ठोकेच चुकले. एकूण पन्नासजण गेले होते. त्यापैकी आठजण समुद्रात बुडाले आणि बेचाळीसजण वाचले. ही घटना कळताच मराठा मंडळ संस्थेवर आणि शिक्षणक्षेत्रात दु:खाचे सावट पसरले. सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी मराठा मंडळच्या अध्यक्ष राजश्री हलगेकर यांना फोन करून ही वार्ता कळविली. लगेच कॉलेजच्या प्राचार्यांसह मराठा मंडळ व्यवस्थापनाचे सदस्यदेखील मालवणकडे रवाना झाले. समुद्रात बुडून मृत पावलेले प्राध्यापक महेश कुडुचकर हे शहापूरच्या आचार्य गल्लीत राहतात. एक वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले असून, त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी आहेत. महेश यांच्या मेहुणीचे रविवारी लग्न आहे. अनुर बोंद्रे हा विद्यार्थीदेखील मालवणला गेला होता, पण तो सुखरूप असल्याचे त्याची आई रूपा बोंद्रे यांनी सांगितले. सांबरा येथील साहित्य संघाचे दिलीप चव्हाण यांची मुलगी आरती चव्हाण तर गणेशनगर सांबरा तेथील करुणा बर्डे, बाँबरगा गावची माया कोल्हे, चुरमुरी गावचा किरण खांडेकर, काकती येथील नितीन मुनतवाडकर, टेंगीनकरा गल्लीतील अवधूत ताशीलदार, आझादनगर येथील मुजमिल हन्नीकेरी यांचा मृत्यू झाला आहे.
काहीजणांच्या पालकांना आपली मुलं पुण्यात स्टडी टूरला गेली आहेत, असा समज होता. शेजारच्या घरात टीव्हीत तुमचा मुलगा समुद्रात बुडालाय, अशी कल्पना दिली. त्यावेळी त्यांचा या घटनेवर विश्वास बसत नव्हता. पालक सरळ कॉलेजला गाठून मगच मालवणला जात होते.

Web Title: Belgaum was heartbroken by the death of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.