ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरणारा बेल्जिअम नागरिक जेरबंद
By admin | Published: April 16, 2017 03:06 AM2017-04-16T03:06:18+5:302017-04-16T03:06:18+5:30
ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डाटा चोरी करुन त्यांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या बेल्जिअम नागरिकाचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे.
मुंबई : ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डाटा चोरी करुन त्यांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या बेल्जिअम नागरिकाचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. अलकान्डो मिख्यालो (४०) असे त्याचे नाव असून त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
जूहू येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोनेरी रंगाचे बनावट एटीएम कार्ड सापडले होते. कोणीतरी खातेदारांचा डाटा चोरी करुन पैसे काढत असल्याच्या तक्रारीही बँकेकडे आल्या. त्यानुसार १ एप्रिलला सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशीनचा डाटा आणि सीसीटीव्ही आधारे केलेल्या तपासणीत विदेशी नागरिक पाच ते सहा गोल्डन प्लास्टीक कार्डचा वापर करून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे चोरी करत असल्याची माहिती उघडकीस आली. त्यानुसार तपास सुरू असताना आरोपी अंधेरीच्या विक्रोळी - लिंक रोड परिसरातील एका इमारतीमध्ये राहत असल्याचे समोर आले. ोलिसांनी शुक्रवारी रात्री सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
त्याच्याकडून दोन गोल्डन प्लास्टीक कार्डसह लॅपटॉप, हार्डडिस्क, इंटरनेट डोंगल, मोबाईल, एक पेन ड्राईव्ह, बनावट एटीएम कार्ड आणि ५९ हजार ९०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. त्याने अनेकांच्या खात्यातून पैसे काढल्याचा संशय असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एक वर्षाच्या पर्यटक व्हीसावर मुंबईत
२०१४ मध्ये परदेशी नागरिक पर्यटक व्हीसावर मुंबईत आला होता. त्यानंतर तो पुन्हा मायदेशी निघून गेला. मुंबईत भाड्याने राहणाऱ्या या पर्यटकाने घरमालकाला दीड लाख रुपये भाडे दिले होते. तो सोनेरी प्लास्टीक कार्डच्या आधारे मुंबईकरांच्या बँक खातेदारांचा एटीएम कार्डचा डाटा चोरी करून एटीएममधून पैसे काढत असल्याचे तपासात समोर आले.
८ बनावट एटीएम कार्ड जप्त
आरोपीकडून चोरी केलेल्या ५९ हजार ९०० रुपयांच्या रोख रकमेसह एक लॅपटॉप, तीन हार्डडीस्क, चार इंटरनेट डोंगल, तीन मोबाईल एक पेन ड्राईव्ह आणि आठ बनावट एटीएम कार्डस जप्त केली आहेत.