मानाने बाजूला व्हावे
By admin | Published: July 12, 2015 03:37 AM2015-07-12T03:37:47+5:302015-07-12T03:37:47+5:30
मी कधीही कुठल्या संस्थेमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही, पण एवढे नक्कीच कळते की विद्यार्थ्यांना नको असेल तर त्या स्वत:हून पदापासून बाजूला व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्ला
नानाचा सल्ला : एफपीआय प्रकरण
पुणे : मी कधीही कुठल्या संस्थेमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही, पण एवढे नक्कीच कळते की विद्यार्थ्यांना नको असेल तर त्या स्वत:हून पदापासून बाजूला व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्ला अभिनेता नाना पाटेकर याने एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना दिला.
त्याचबरोबर आपण संस्थेमध्ये शिकण्यासाठी आलो आहोत, आंदोलन करण्यासाठी नव्हे; त्यामुळे वेळ निष्कारण वाया घालवू नका... यात तुमचेच नुकसान आहे, असे सांगत आमच्या काळात कुठल्या शिक्षकाने कान पिळावा, हे आम्हाला कधी ठरवता आले नाही, अशी टिप्पणीही त्याने केली.
चौहान यांच्यासह नियामक मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या इतर सदस्यांची नियुक्ती देखील रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्वस्तरावरून पाठिंबा मिळत आहे. अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, अमोल पालेकर यांच्यानंतर आता नाना पाटेकर यानेही विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवीत चौहान यांनाच मानाने बाजूला होण्याचा सल्ला दिला आहे.
नाना म्हणाला, चौहान यांना मी ओळखत नाही. ‘महाभारता’तले युधिष्ठिर, कर्ण, दुर्योधन वगैरे पात्र मी स्वत:च स्वत:मध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘महाभारत’ मालिका कधीच पाहिली नाही. मुळात कुठल्यातरी पक्षाची आहे, म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते, असे मला वाटत नाही. गुलजार किंवा अमिताभ बच्चन यांना डावलून गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावर बसविण्यात आले हे म्हणणे तर मूर्खपणाच आहे. कारण बच्चन आणि गुलजार आपल्या कामात एवढे व्यस्त आहेत, की त्यांना यासाठी द्यायला वेळ आहे असे वाटत नाही, असे नानाने स्पष्ट केले.
आयुष्यात भूक, दारिद्र्य, अवेहलना हेच शिक्षक माझ्या वाट्याला आले. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, अशी वेदना सांगत, विद्यार्थ्यांनी फार ताणू नये. विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकता आले पाहिजे, यामध्ये विद्यार्थ्यांचेच नुकसान अधिक होणार असल्याची कळकळही त्याने व्यक्त केली.