शासन निधीत अडकली नाट्य संमेलनाची ‘घंटा’
By Admin | Published: February 2, 2016 01:18 AM2016-02-02T01:18:34+5:302016-02-02T01:18:34+5:30
नाट्यसंस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, याकरिता नाट्य संमेलनाची ‘घंटा’ दरवर्षी शासनभरोसे वाजवली जाते. यंदा दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या ‘नाट्यात’ याच ‘घंटे’चे भवितव्य अडकले आहे
पुणे : नाट्यसंस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, याकरिता नाट्य संमेलनाची ‘घंटा’ दरवर्षी शासनभरोसे वाजवली जाते. यंदा दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या ‘नाट्यात’ याच ‘घंटे’चे भवितव्य अडकले आहे. संमेलन अवघे पंधरा दिवसांवर आले तरी सरकारकडून २५ लाख रुपयांचा निधी अद्याप नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेला मिळालेला नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. संमेलनाचा निधी दसऱ्याच्या मुहूर्तावर संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा होईल, अशी सांस्कृतिकमंत्र्यांची घोषणा अद्यापतरी केवळ घोषणाच ठरली आहे.
येत्या १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ठाण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे. जेमतेम पंधरा दिवसांचा कालावधी असतानाही नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निधीसाठी पाठपुरावा करावा लागत आहे. साहित्य संंमेलनासाठी साहित्य महामंडळाला वेळेपूर्वीच निधी मिळतो, मग नाट्य संमेलनाला ही सापत्न वागणूक का? असा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेना आणि भाजपा दोघेही सत्तेत असले तरी दोघांमधून विस्तवही जात नसल्याची सध्याची स्थिती आहे. यातच शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याने संमेलनावर शिवसेनेचा प्रभाव राहणार असल्याने भाजपाने निधीसाठी जाणीवपूर्वक आयोजकांना काहीसे ‘वेठीस’ धरल्याचा सूर कानावर पडत आहे. या दोघांच्या भांडणाचा फटका नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बसत आहे.
राज्य शासनातर्फे साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनासाठी दर वर्षी २५ लाख रुपये दिले जातात. पूर्वी हा निधी केव्हा मिळेल याची खात्री नव्हती. निधीसाठी पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात वारंवार खेटे घालावे लागत. साहित्य महामंडळ व नाट्य परिषदेकडून लेखी स्वरूपात प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबतीत निर्णय होत.
यामध्ये संमेलनाच्या तारखा जवळ आल्या तरी प्रत्यक्ष निधी मिळत नसे. मात्र, सरकार बदलल्यानंतर घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी निधी दसऱ्याच्या आधी मिळेल, अशी घोषणा करून आयोजकांना दिलासा दिला होता. त्यानुसार विनोद तावडे यांनी आपली घोषणा खरी करून दाखवली पण नाट्य संमेलनाच्या पदरी काहीशी उपेक्षाच आली आहे. (प्रतिनिधी)