कोल्हापूरसह पुण्यात फिरते खंडपीठ
By Admin | Published: April 1, 2017 03:21 AM2017-04-01T03:21:29+5:302017-04-01T03:21:29+5:30
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होत नाही तोपर्यंत कोल्हापूर आणि पुणे येथे फिरते खंडपीठ व्हावे
मुंबई : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होत नाही तोपर्यंत कोल्हापूर आणि पुणे येथे फिरते खंडपीठ व्हावे, अशी विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करावे, या मागणीसाठी गेल्या तीस वर्षांपासून वकील व पक्षकारांचा लढा सुरू आहे. यामुळे लवकरात लवकर सर्किट बेंच स्थापन करावे, असा लक्षवेधी प्रश्न शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली व सातारा या सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून वकील करीत आहेत. त्यासाठी गेल्या चार वर्षांत आंदोलने होत आहेत, याकडे आमदार क्षीरसागर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुरेश हाळवणकर यांनीही हा प्रश्न उचलून धरला.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापूर आणि पुणे येथे खंडपीठ व्हावे, ही शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे, अशी शिफारस उच्च न्यायालयास केली आहे. त्याचबरोबर पुणे येथेसुद्धा खंडपीठ व्हावे, ही शासनाची भूमिका आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी खंडपीठ होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर आणि पुणे येथे फिरते खंडपीठ व्हावे, अशी विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे करण्यात येईल. पंतप्रधान आणि केंद्रीय विधि व न्यायमंत्री यांच्याकडेही विनंती करून या मागणीचा पाठपुरावा केला जाईल. (प्रतिनिधी)
मुंबई हायकोर्टाच्या प्रश्नांबाबत बैठक
मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्य न्यायामुर्तींसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.आशिष शेलार यांच्या प्रश्नात दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील वस्तू आणि त्यातील सोईसुविधासह रिक्तपदे असे अनेक विषय प्रलंबित असून त्याबाबत सरकारने तत्काळ उपयोजना करावी अशी मागणी शेलार यांनी केली.