चारसूत्री भात लागवडीचा प्रयोग आदिवासी भागात ठरला लाभदायी
By admin | Published: October 24, 2016 08:36 AM2016-10-24T08:36:20+5:302016-10-24T08:36:20+5:30
जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला
लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे ( नाशिक), दि. २४ - भाताचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या इगतपुरी तालुक्यात हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे राहिले असताना महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला आहे.
आठवड्याभरात सोंगणीला वेग येणार असून भातशेतीतून उत्पादन देखील चांगले मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारीशिंगवे परिसरात भात कापणी सुरु झाली असून, मजूर खर्च परवडत नसल्यामुळे भात कापणी यंत्राच्या साहाय्याने येथील शेतकरी वसंत बोराडे, शिवाजी बोराडे, पांडुरंग बोराडे, गुलाब भले, कैलास भले, गोविंद लहांगे यांनी शेतात लागवड केलेली चारसुत्री भात कापणी सुरु केलेली आहे. मंडळ कृषी अधिकारी अरु ण पगारे, कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभत आहे. मुबलक पाऊस परंतु खडकाळ जमिनीमुळे तालुक्यातील वासाळी येथे कायमच दुष्काळी परिस्थिती असते. अशात शेतकरी धास्तावले होते. गेल्या चार वर्षात पावसाचे स्वरूप, उपलब्ध पाणीसाठा यावर अवलंबून शेतीवर मोठा विपरीत परिणाम होताना दिसत होता. तालुक्यात नैसर्गिक बदलाच्या समस्या ‘आ’वासून उभ्या असताना शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने व शेततळे झाल्यामुळे पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला. शेती संशोधन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असताना पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवारातील सिमेंट काँक्रीट बंधारे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले आहेत. भातशेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण करून आधुनिक पीकपद्धती राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.