नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना ‘कॅस’चा लाभ द्यावा
By admin | Published: February 26, 2015 12:45 AM2015-02-26T00:45:22+5:302015-02-26T00:47:00+5:30
उच्च न्यायालयाचा आदेश; ‘सुटा’ची माहिती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना आश्वासित प्रगती योजनेचा (कॅस) लाभ द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) सहकार्यवाह प्रा. डॉ. आर. जी. कोरबू यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात असे म्हटले आहे की, ‘सुटा’तर्फे आॅक्टोबर १९९२ ते ३ एप्रिल २००० या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना ‘कॅस’चे लाभ मिळावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमध्ये कोल्हापूरमधील १२६, सांगलीमधील १४२ आणि साताऱ्यातील ११७ प्राध्यापक याचिकाकर्ते होते. याचिकेबाबत मंगळवारी (दि. २४) उच्च न्यायालयाने संबंधित प्राध्यापकांना ‘कॅस’चे सर्व लाभ देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यापीठ क्षेत्रातील नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना त्यांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून धरून त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासन आणि शिक्षण सहसंचालक हे नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना ‘कॅस’चा लाभ देण्याबाबत टाळाटाळ करीत होते. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठ व शिक्षण सहसंचालक कार्यालयाने तातडीने करावी, अशी ‘सुटा’ची मागणी आहे. (प्रतिनिधी)
नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना त्यांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून धरून पदोन्नतीचा लाभ मिळणार