कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ कारागृह प्रशासनालाही, गृहविभागाचा निर्णय
By admin | Published: July 4, 2016 10:18 PM2016-07-04T22:18:06+5:302016-07-04T22:18:06+5:30
आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास आता कारागृह प्रशासनात काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांनाही पोलिसांप्रमाणेच आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ मिळणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4 - आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास आता कारागृह प्रशासनात काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांनाही पोलिसांप्रमाणेच आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वीच गृह विभागाच्या उप-सचिवांनी अशा प्रकारची माहिती देणारे परिपत्रक संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुखांना पाठविले आहे. परिणामी संबंधितांना दिलासा मिळाला आहे.
अपघात झाला अथवा एखादा गंभीर आजार उद्भवल्यास मोठ्या रक्कमेच्या वैद्यकीय खर्चाचा भार कसा सोसावा, असा प्रश्न संबंधितांना पडतो. शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना विविध योजनांनुसार आरोग्य योजनेचे कवच असल्याने त्यांना फारशी अडचण भासत नाही. मात्र, अनेक विभागात काम करणा-यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने संबंधितांची मोठी कुचंबना होते. अशीच कुचंबना कारागृह प्रशासनात काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांच्याच्या वाट्याला आली आहे. ती ध्यानात घेत गृहविभागाने पोलिसांप्रमाणेच कारागृहात काम करणा-या गणवेषधारी तुरूंगाधिकारी, कारागृह रक्षकांनाही आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलैला या निर्णयाचे परिपत्रक गृहविभागाचे उपसचिव जयसिंग पावरा यांनी संबंधित विभागप्रमुखांना पाठविले आहे.
५० लाखांची तरतुद
या निर्णयानुसार, आरोग्य कुटूंब योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाखांची तरतुद केली आहे. अंमलबजावणीचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह) यांना राहणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली आहे. आरोग्य कुटूंब योजनेचा लाभ मिळणार असल्याचे कळाल्याने शेकडो संबंधित कुटुंबीय सुखावले आहेत.
---