४ हजार बालकांना नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा लाभ
By Admin | Published: October 13, 2016 07:04 PM2016-10-13T19:04:32+5:302016-10-13T19:04:32+5:30
नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 13 - नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात खाजगी दवाखान्याच्या तुलनेत हायटेक सुविधा मिळत असून मागील तीन वर्षात ४ हजार बालकांना नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा लाभ मिळाला आहे.
नवजात कमी वजनाची बाळ जन्माला आल्यास अथवा गंभीर आजार असल्यास त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो. प्रसुतीपश्चात बाळाला झटके येणे, बाळाच्या श्वासाची गती जलद चालणे, बाळ स्तनपान करीत नसेल, बाळाला कावीळ, धर्नुवात तसेच जंतु संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी सन २०१३ पासून सामान्य रूग्णालयात अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग कार्यान्वित झाला आहे. निरोगी माता-निरोगी बाळ हे शासनाचे ध्येय असून मातेच्या गरोदरपणापासून तर प्रसुतीदरम्यान सर्व सुविधा आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात येतात. नवजात बाळासोबत मातेचीही काळजी घेतली जात आहे.
नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच प्रसुतीपश्चात बाळाला योग्य सुविधा मिळण्यासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभागात हायटेक सुविधा मिळत आहेत. जन्मानंतर बाळाला एक दिवस, तीन, सात तसेच यापेक्षा जास्त दिवस शिशु विभागात ठेवले जाते. खाजगी रूग्णालयात अत्यंत महागडी व खर्चिक उपचार पध्दती शासनाच्यावतीने मोफत मिळत आहे. सामान्य रूग्णालयात एका वेळेस १३ बालकांना ठेवल्या जाईल एवढी सुविधा आहे. रूग्णालयात जन्मलेले बाळ, बाहेरून आणलेले बाळ यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधेसाठी कर्मचारी नेहमीच आहे. खामगाव तालुक्यासह घाटाखालील शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर तसेच मुक्ताईनगर, मेहकर व चिखली तालुक्यातील नागरीक येथे उपचारासाठी धाव घेत आहेत. एप्रिल २०१३ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत सुमारे ४००२ बालकांना अतिदक्षता विभागाचा लाभ मिळाला आहे.
गरीबांसाठी शिशु विभाग संजीवनी
प्रसुतीपश्चात नवजात बालकांची उपचार पध्दती खाजगी दवाखान्यात अत्यंत महागडी आहे. सामान्य तसेच गरीब कुटुंबियांना खाजगी दवाखान्याचा खर्च पेलवणे शक्य होत नाही. परिणामी अनेकदा उपचाराअभावी नवजात बालकांना जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने गरीब कुटुंबासाठी हा विभाग संजीवनी ठरला आहे. नवजात बालक व मातेसाठी रूग्णालयातील स्वतंत्र सुविधा वाखाणण्याजोगी आहे.
शासनाच्या धोरणानुसार बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी सामान्य रूग्णालयात अद्ययावत सर्व यंत्रसामुग्री सुविधासह नवजात शिशु अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. खासगी रूग्णालयात महागडी असलेली सुविधा रूग्णालयात मोफत मिळत असल्याने नागरीकांनी लाभ घ्यावा.
- डॉ.एस.के.सिरसाठ,
वैद्यकीय अधिक्षक सामान्य रूग्णालय खामगाव.