मराठवाड्यात बरसला; बाप्पा पावला!

By admin | Published: September 15, 2016 03:56 AM2016-09-15T03:56:42+5:302016-09-15T03:56:42+5:30

घरोघरी विराजमान झालेल्या श्री गणरायांना निरोप देण्याची वेळ आली असतानाच तहानलेल्या मराठवाड्यात बुधवारी सर्वदूर परतीचा जोरदार पाऊस झाला.

Berala in Marathwada; Bappa! | मराठवाड्यात बरसला; बाप्पा पावला!

मराठवाड्यात बरसला; बाप्पा पावला!

Next

पुणे/औरंगाबाद : घरोघरी विराजमान झालेल्या श्री गणरायांना निरोप देण्याची वेळ आली असतानाच तहानलेल्या मराठवाड्यात बुधवारी सर्वदूर परतीचा जोरदार पाऊस झाला. जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाल्याने जणू बाप्पाच पावल्याचा आनंद बळीराजाला झाला. कोकण,
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे़
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत बुधवारी दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील पाचही मंडळांत आणि लोहारा तालुक्यातील माकणी मंडळात अतिवृष्टी झाली़ औरंगाबादेतील पैठण, वैजापूरसह नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पाऊस झाला. मसलगा परिसरातील पिके पाण्याखाली गेली असून काही घरांना भेगा पडल्या आहेत़ लातूर शहरानजीक असलेल्या साई व नागझरी बॅरेजेसमध्ये १० से़मी़ ने वाढ झाली आहे़ पाणीपातळी ३़४५ मीटरवर आली आहे़ मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी ४ से़ मी़ ने वाढली आहे़
उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. उमरगा तालुक्यात तब्बल ९१ मि.मी. पावसाची नोंद झाली़ लोहारा तालुक्यातील माकणी मंडळातही अतिवृष्टी झाली़
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस बरसत आहे. बुधवारी दुपारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले़ गोदा पात्रात पाण्याचा येवा वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला.
परभणी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पहाटे जोरदार पाऊस झाला. पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यांत एक ते दीड तास हा पाऊस बरसला. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ५६़२ मि.मी. पाऊस झाला. पालम शहरपासून अर्धा किमी अंतरावरील लेंडी नदीला पूर आला होता़ त्यामुळे आरखेड, फळा, घोडा, उमरथडी, सायाळा या गावातील ग्रामस्थांचा पालम शहराशी संपर्क तुटला होता़
हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत परिसरातही पावसाचा जोर होता. बीड जिल्ह्यातील आकरा पैकी दहा तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

गणरायाच्या निरोपाला पाऊसही येणार
राज्यात गुरुवारी भव्य मिरवणुकांनी गणरायाचे विसर्जन होत असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़

Web Title: Berala in Marathwada; Bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.