वाहतूक पोलीस मुख्यालयात बर्म्युडा घालून येण्यास बंदी
By admin | Published: August 14, 2014 03:37 AM2014-08-14T03:37:14+5:302014-08-14T03:37:14+5:30
देशातील कोणत्याही पोलीस शाखेत आजवर काढला गेला नसेल असा अजब फतवा मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिला आहे.
डिप्पी वांकाणी, मुंबई
देशातील कोणत्याही पोलीस शाखेत आजवर काढला गेला नसेल असा अजब फतवा मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात अभ्यागतांना बर्म्युडा घालून येण्यास मज्जाव केला गेला आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर तशी रीतसर नोटीस लावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त कैसर खालीद यांनी याविषयी ‘लोकमत’ला सांगितले, एकदा अमेरिकेतील एक अनिवासी भारतीय टीशर्ट आणि बर्म्युडा परिधान करून कार्यालयात आला. एका व्यक्तीचा संदर्भ देऊन तो आला होता. मी त्याला तो अमेरिकेत काय काम करतो असे विचारल्यावर त्याने तो सॉप्टवेअर इंजिनीअर असल्याचे सांगितले. मी त्याला विचारले की तू तुझ्या आॅफिसमध्येही अशाच वेशात जातोस का, त्यावर त्याने म्हटले की मी असा कसा काय एखाद्या आॅफिसात जाऊ शकतो. त्यावर मी त्याला म्हणालो की, पोलीस गंभीर काम करतात आणि त्यांच्या कार्यालयात जाताना काही शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
तो अमेरिकन जोपर्यंत पूर्ण लांबीची पँट घालून व्यवस्थित पोषाख करून आला नाही तोवर मी त्याचे काम केले नाही, अशी पुस्तीही खालीद यांनी जोडली.
खालीद यांनी असाच आणखी एक किस्सा सांगितला. अभिनेता अली फैसल देखील एकदा त्याच्या पासपोर्टसंबंधी काही काम घेऊन बर्म्युडा घालून आमच्या कार्यालयात आला. आमच्या कॉन्स्टेबलनी त्याला व्यवस्थित पोषाख करून येण्यास सांगितले आणि त्यानंतरच त्याचे काम केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते एखादी व्यक्ती अशा अवतारात कार्यालयात आल्यास कार्यालयाची एकंदर शिस्त आणि कामाचा मूड बिघडतो. त्यामुळेच यापूर्वीही पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही असे शिस्तपालन करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.