BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:55 PM2024-03-01T18:55:09+5:302024-03-01T18:59:46+5:30
बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून पाससाठी नवे दर १ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.
Ashish Shelar on BEST ticket rates increase: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांच्या खिशाला झळ बसली. मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या 'बेस्ट'चा प्रवास महागला. बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. १ मार्चपासून बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपये तर मासिक पासच्या दरात १५० रुपयांनी वाढ लागू करण्यात आली आहे. याच मुद्द्यावर आज, बेस्टच्या दर वाढीला स्थगिती द्या, अशी मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.
बेस्टच्या मासिक पासात करण्यात आलेली दर वाढ ही अवाजवी असून तीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. याबाबत औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार शेलार म्हणाले की, बेस्टच्या मासिक व विकली पासच्या दरात आजपासून वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईतील सामान्य माणसाची दळणवळणाची व्यवस्था ही बेस्टची बस आहे. ३५ लाख प्रवासी त्यात प्रवास करतात. गेल्या वर्षात सात ते आठ लाख प्रवासी वाढले. कामावर जाणारी माणसे, शाळकरी मुले त्यातून प्रवास करतात. त्यामुळे बेस्टच्या मासिक पासमध्ये ८७ टक्क्यांनी तर विकली पासमध्ये १७ टक्क्यांनी झालेली वाढ अन्यायकारक आहे. त्याला स्थगिती द्यावी अशी विनंती त्यांनी सभागृहात केली.
पासाच्या दरात वाढ, तिकीटांचे दर 'जैसे थे'
बेस्टने पासच्या दरात वाढ केल्याने आजपासून खर्चात भर पडणार आहे, मात्र बेस्टच्या तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. फक्त दैनंदिन पास आणि मासिक पासच्या दरात वाढ झाली आहे, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दरम्यान, बेस्टने विद्यार्थ्यांसाठीची सवलत कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांसाठी २०० रुपयांच्या मासिक पासमध्ये अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. बेस्टच्या नव्याने लागू करण्यात आलेल्या दरानुसार, ४२ ऐवजी आता १८ पास असतील. यामध्ये ६ रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपये वातानुकूलित आणि विनावातानुकूलित बस प्रवास भाड्यासाठी साप्ताहिक आणि मासिक पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.