बेस्ट कर्मचाऱ्यांचा उद्या ठिय्या
By Admin | Published: March 21, 2017 02:39 AM2017-03-21T02:39:50+5:302017-03-21T02:39:50+5:30
बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्युत आणि परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन दिरंगाईने
मुंबई : बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्युत आणि परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन दिरंगाईने होत असल्याचा आरोप बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. परिणामी, बेस्ट प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी, २२ मार्च रोजी दुपारी १ वाजता वडाळा आगारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गायकवाड म्हणाले की, या महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला असला, अद्याप पुढील महिन्याच्या वेतनाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. बेस्ट आर्थिक संकटात असल्याचा भास प्रशासन निर्माण करत आहे. मात्र त्यामागील खरे कारण हे कर्मचाऱ्यांचा वेतन करार आहे. बेस्ट प्रशासन आणि कामगारांमधील वेतन कराराला एक वर्ष पूर्ण होत आले तरी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्याचे औदार्य प्रशासन दाखवत नाही. याउलट गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १० तारखेनंतर देऊन बेस्टची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा कांगावा प्रशासन करीत आहे. प्रलंबित वेतन करार टाळण्यासाठीच प्रशासन हे केविलवाने प्रयत्न करीत असल्याचा गायकवाड यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)