...अखेर बेस्ट संप १६ तासांनी मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 05:09 AM2017-08-08T05:09:24+5:302017-08-08T05:10:34+5:30
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. तरीही लेखी आश्वासनासाठी अडून बसलेले कामगार नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतर नरमले. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी गेले काही महिने महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सहा वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्याने, कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल कोणी घेत नसल्याचे पाहून कामगारांनी संपाचा इशारा दिला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत बेस्ट कर्मचाºयांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केले, परंतु असे लेखी आश्वासन देण्यास ते तयार नसल्याने, कामगार संघटनांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. या संपात ३६ हजार कामगार-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बससेवा ठप्प झाली.
बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी लाइफ लाइन असल्याने, मुंबईकरांचे सोमवारी दिवसभर प्रचंड हाल झाले. ज्याचा पुरेपूर फायदा उठवित, रिक्षा, टॅक्सी व खासगी बस वाहतुकीने प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळत आपले खिसे भरले.
उद्धव ठाकरेंची दिलगिरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर कामगार नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बेस्टची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली. बेस्टचे पगार वेळेत होतील, याची शाश्वती त्यांनी कामगार नेत्यांना दिली.
मात्र, हे आश्वासनही तोंडीच असताना, बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. कामगार नेत्यांनी संपाचे हत्यार म्यान केल्याने, कामगार सायंकाळी कामावर रूजू झाले. त्यानंतर, बेस्ट बस गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रक्षाबंधनानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे बेस्ट संपामुळे हाल झाले, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर मुंबईकरांची माफी मागितली. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. याबाबत आपण दिलगीर आहोत, असे त्यांनी सांगितले.