पुणे पालिका देशात सर्वोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2016 02:03 AM2016-09-08T02:03:45+5:302016-09-08T02:03:45+5:30
पुणे : आर्थिक स्थिती व आर्थिक उलाढालीतील निकषांवरून केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मानांकनामध्ये पुणे महापालिका देशात सर्वोत्तम ठरली आहे
पुणे : आर्थिक स्थिती व आर्थिक उलाढालीतील निकषांवरून केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मानांकनामध्ये पुणे महापालिका देशात सर्वोत्तम ठरली आहे. दिल्ली महापालिकेलाही पुण्याने यात मागे टाकले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून ही मानांकने देण्यात येत असतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे मानांकन अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यासाठी संबंधित संस्थांची आर्थिक स्थिती चांगली असणे आवश्यक असतेच, शिवाय सर्व आर्थिक व्यवहारात शिस्त, नियम यांचे पालनही महत्त्वाचे समजले जाते. पुणे महापालिकेला यात सर्वोत्तम असे मानांकन मिळाले आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिका कर्जरोखे काढण्याच्या विचारात असून, त्यासाठी पालिकेला हे मानांकन महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबद्ध विकास करून गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्या करताना आर्थिक शिस्त पाळली. त्याचाच परिणाम म्हणून पालिकेला हे सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे, असे याबाबत बोलताना महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. राज्यासाठी यात अभिमानाची बाब म्हणजे मानांकन मिळालेल्या एकूण १२ महापालिकांपैकी तब्बल ६ पालिका या महाराष्ट्रातील आहेत. (प्रतिनिधी)