साध्या व वातानुकूलित बसपासमध्ये बेस्ट कपात
By admin | Published: May 4, 2016 07:45 PM2016-05-04T19:45:35+5:302016-05-04T19:45:35+5:30
बस भाड्यात कपात करणार, ही भाजपाची घोषणाबाजी अखेर धूळफेकच ठरली़ बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : बस भाड्यात कपात करणार, ही भाजपाची घोषणाबाजी अखेर धूळफेकच ठरली़ बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़. मात्र मासिक व त्रैमासिक बस पास आणि वातानुकूलित बस भाड्यात कपात करुन प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे़ या प्रस्ताव बेस्ट समितीने आज मंजुरी दिली़
बेस्ट समितीचे अध्यक्षपद येताच भाजपाने वीज आणि भाडे कपात करीत असल्याचे घोषणा केली़ त्यानुसार फिडर मार्ग म्हणजेच कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते़ प्रत्यक्षात बसमार्गांमध्ये नवीन टप्याचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे दाखविण्यात आले आहे़
मात्र बेस्टने बसच्या मासिक व त्रैमासिक पासाच्या रक्कमेत खऱ्या अर्थाने कपात केली आहे़ त्यामुळे प्रवाशांचे ३० ते १०० रुपये वाचणार आहेत़ प्रवाशीवर्ग वाढविण्यासाठी वातानुकूलित बसचा दैनंदिन पास दोनशे रुपयांवरुन दीडशे रुपये तर मासिक बसपास दीड हजार रुपयांनी कमी करण्यात आला आहे़
बस भाडेकपातीची धूळफेक
फिडर मार्ग म्हणजेच घरापासून रेल्वे स्थानकांपर्यंत यावर सर्वाधिक प्रवाशी असतात़ या बसमार्गांवरील भाड्यात कपात करण्यात येणार असल्याची घोषणाबाजी भाजपाने केली़ मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावात बस प्रवासाचे नवीन टप्पे टाकून भाडेकपात केल्याचे भासविण्यात येत आहे़ यामुळे मुंबईकरांना कोणताच फायदा नसून बेस्टचे नुकसान मात्र होणार आहे़
अशी आहे भाडेकपात
कि़मी़ विद्यमान बसभाडे नवीन भाडे
२ ८ ८
४ १० १०
६ १४ १४
१० १८ १८
यामध्ये नवीन १२ टप्पा टाकून त्याचे भाडे २० रुपये करण्यात आले आहे़
१४ २२ २२
१७ टप्पा टाकून त्याचे भाडे २४ रुपये करण्यात आले आहे़
२० २६ २६
२५ हा नवीन टप्पा त्याचे भाडे २८ रुपये
३० ३० ३०
३५ टप्पा टाकून त्याचे भाडे ३६ रुपये
४० ४२ ४२
४५ टप्पा टाकून त्याचे भाडे ४६ रुपये
५० ५० ५०
भाडेकपातीमध्ये उत्पन्नात घट
बसभाड्यांमध्ये कपात केल्यानंतर दररोज बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात चार लाख ६१ हजार रुपयांची घट होणार आहे़ त्यामुळे या बसगाड्यांचे दररोज २२ हजार ३३५ प्रवासी वाढविणे आवश्यक आहे़ बस पासमध्ये ३० दिवसांऐवजी २२ दिवसांचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार आहेत़ तर त्रैमासिक पास ९० ऐवजी ६६ दिवसांचा असणार आहे़ मासिक व त्रैमासिक बसगाड्यांच्या भाड्यात कपात केल्यामुळे दररोज चार लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे या मार्गावर दररोज ५५५ जादा प्रवाशी मिळण्याची गरज आहे़
वातानुकूलित बसगाड्यांचा दैनंदिन पास दोनशे रुपयांऐवजी दीडशे रुपये, मासिक बसपास ४८०० वरुन ३३०० रुपये तर त्रैमासिक पास ९९०० रुपयांचा असणार आहे़ या भाडेकपातीमुळे एक लाख ६० हजार रुपये उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे वातानुकूलित बसगाड्यांचे आणखी २४०० प्रवाशी वाढविण्याची गरज आहे़