पावसाळ्यातही बसचा मार्ग बेस्ट
By admin | Published: July 22, 2016 03:24 AM2016-07-22T03:24:33+5:302016-07-22T03:24:33+5:30
पाणी तुंबल्याचा पहिला फटका वाहतुकीला बसतो़ मात्र, विविध उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढली आहे़
मुंबई : पावसाळ्यात पाणी तुंबल्याचा पहिला फटका वाहतुकीला बसतो़ मात्र, विविध उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढली आहे़ त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबल्यामुळे बसमार्ग बदलण्याचे प्रमाण ९४ टक्के घटले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़
गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाला होता़ मात्र, त्याही काळात जून महिन्यातील पावसात पाणी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी बेस्टचा बसमार्ग वळविण्यात आला होता़ हे प्रमाण ४४ तास १० मिनिटे एवढा होता़ या वर्षी सायन रोड क्ऱ २४ आणि हिंदमाता या परिसरातच काही काळच पाणी तुंबले़ त्यातही या पाण्याचा निचरा लवकर झाल्यामुळे बेस्टचे बसमार्ग दोन तास ५० मिनिटे या तात्पुरत्या काळासाठी अन्यत्र वळविण्यात आले होते़ (प्रतिनिधी)
>हमखास तुंबणारी ठिकाणे
एलफिन्स्टन पुलाचा परिसर, गांधी मार्केट किंग्ज सर्कल, सायन रोड क्ऱ २४, कुर्ला परिसरातील शेल कॉलनी मार्ग, हिंदमाता परिसर, मिलन सबवे, पिटवाल मार्ग, सयानी रोड, परळ एस़टी़ डेपो, स्वामी विवेकानंद मार्ग, दादर ट्राम टर्मिनस परिसर, दादर टी़टी़, दादर वर्कशॉप, सुंदर विहार, प्रतीक्षा नगर, मडके बुवा चौक, परळ ट्राम टर्मिनस येथील बसमार्ग गेल्या पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे ४४ तास १० मिनिटांसाठी वळविण्यात आले होते़