गणेशोत्सवासाठी ‘बेस्ट’ सेवा
By admin | Published: August 16, 2016 01:56 AM2016-08-16T01:56:16+5:302016-08-16T01:56:16+5:30
मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारे बेस्ट प्रशासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यंत्रणेसह गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे.
मुंबई : मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारे बेस्ट प्रशासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यंत्रणेसह गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. बेस्टने गणेशोत्सव मंडळांकरिता विद्युत रोशणाईकरिता एक खिडकी योजनेअंतर्गत तात्पुरता वीजपुरवठा देणे, मार्गप्रकाश योजनेद्वारे श्रींच्या विसर्जनावेळी खास प्रकाशयोजना करणे, गणेशोत्सवादरम्यान अत्याधुनिक संपर्क सुविधा कार्यान्वित करणे आणि आॅनलाइन मागणीपत्र नोंदणी करणे; अशी चार स्तरीय योजना आखली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रस्ता अथवा पदपथावर मंडपाची उभारणी करणाऱ्या गणेश मंडळांना वीजजोडणीसाठीचा अर्ज करताना महापालिकेकडून मंडप उभारणीबाबतचे प्राप्त ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असणार आहे. शिवाय संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीची या वर्षीची अथवा गतवर्षाची प्रत अर्जासोबत जोडणे आणि या वर्षी संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज केलेल्या पोचपावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक असणार आहे. बेस्टकडून गणेशविसर्जनावेळी विसर्जनाच्या मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रखर प्रकाशयोजना पुरवण्यात येणार आहे. प्रमुख विसर्जन स्थळे आणि कृत्रिम तलाव येथेही मनोरे उभारून प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास जीवरक्षकांच्या मदतीकरिता सर्च लाईट बसवण्यात येतील. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे सिस्टीम व सुपरवाईझरी कंट्रोल २४ तास कार्यरत असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना विसर्जनस्थळी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून भ्रमणदूरध्वनी, वॉकीटॉकी दिला जाईल. (प्रतिनिधी)
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वीज चोरीच्या मोहात पडू नये. अधिकृतरीत्या बेस्टकडूनच वीज घ्यावी. अनधिकृतरीत्या वीजपुरवठा घेतल्यास अपघात होण्याची भीती आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विभागातील कक्ष आणि दोष निवारण कक्षाशी संपर्क साधावा.