खासगी बस सेवांमुळे बेस्टचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: August 27, 2016 02:00 AM2016-08-27T02:00:38+5:302016-08-27T02:00:38+5:30
रिक्षा, टॅक्सी, मोनो, मेट्रो अशा स्पर्धेनंतर आता खासगी बसगाड्यांचे आव्हान बेस्टपुढे उभे राहिले आहे़
मुंबई : रिक्षा, टॅक्सी, मोनो, मेट्रो अशा स्पर्धेनंतर आता खासगी बसगाड्यांचे आव्हान बेस्टपुढे उभे राहिले आहे़ मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या सभेमध्ये मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील खासगी कंत्राटी परवाना व खासगी सेवा वाहन परवाना असणाऱ्या बसगाड्यांना मुक्त संचारास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे बेस्टचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी शुक्रवारी केली़ याविरोधात सोमवारी टॅक्सी संपामध्ये बेस्ट कर्मचारीही उतरतील, असा इशारा देण्यात आला.
बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यात आहे़ शेअर रिक्षा-टॅक्सी, मोनो, मेट्रो व खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत बेस्टच्या प्रवाशांची संख्या ४२ लाखांवरून ३६ लाखांवर आली आहे़ त्यात आता खासगी बसगाड्यांनाही मुंबईत सेवा पुरविण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी उमटले़ प्रचंड वाहतूककोंडीत दररोज बेस्टच्या बसगाड्या ७ लाख किलोमीटर अंतर कापत असतात़ आपत्ती काळातही बेस्ट मदतीसाठी पुढाकार घेत असते़ तरीही बेस्ट सेवा ही प्रवाशांची सेवा करण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, अशी खंत शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केली़ बेस्टची ताकद कमी करून खासगीकरणाची वाट मोकळी करून देण्याचा हा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला़ गावखेड्यात ४५ हजार बसगाड्यांची आवश्यकता असताना राज्य परिवहनच्या गाड्या मुंबईत चालविण्याचे प्रयोजन काय, असा सवाल शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केला़ अखेर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनी दिले़ (प्रतिनिधी)
>टॅक्सीच्या संपात बेस्ट
टॅक्सी संघटनांनी सोमवारी संपाचा इशारा दिला आहे़ या संपात बेस्ट कर्मचारीही उतरतील, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी व बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी दिला आहे़
बेस्टच्या ताफ्यात गेल्या वर्षीपर्यंत ४ हजार ७०० बस होत्या. त्या आता ३ हजार ८०० वर आल्या आहेत;तर प्रवासीसंख्या ४२ लाखांवरून ३६ लाखांवर घसरली आहे़