अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:50 PM2023-03-25T21:50:21+5:302023-03-25T21:50:44+5:30

चंद्रपूरहून 29 मार्चला जाणार काष्ठ, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

Best teak wood from Maharashtra for Sri Ram temple in Ayodhya | अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

googlenewsNext

Ayodhya Ram Mandir: चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्यामहाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील   इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे.

निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील देहराडून येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अँड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती. मुनगंटीवार यांनी या विषयात व्यक्तीश: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याकरीता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधीकाऱ्यांना दिल्या.

सागवानचे हे काष्ठ 29 मार्च 2023 रोजी विधीवत पूजा करून आणि शोभायात्रा काढत अयोध्येकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच ट्रस्टने ना. श्री. मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

लाकडावर करणार नक्षीकाम व कोरीवकाम- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते व कलावंत नक्षीकाम करणार आहेत. सागवानचे हे काष्ठ ना. श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शुभहस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.

असा असेल काष्ठपूजन सोहळा- चंद्रपूर जिल्हा हा देशातील घनदाट वने असलेला आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. देशातील सर्वात जास्त वाघ याच जिल्ह्यात आहेत. रामायणकालीन सुप्रसिद्ध दंडकारण्यात वसलेल्या या जिल्ह्याला अगदी रामायण काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच अतिशय समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरांचा वारसाही चंद्रपूरला लाभला आहे. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होता. अशा या चंद्रपूरमधून देशाच्या अभिमानाचे केंद्र ठरलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणी करिता अत्यावश्यक सागवान मागवले गेले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि समाजातील श्रीरामभक्तीला उजळवणारी बाब आहे.त्यामुळेच चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.

ही शोभायात्रा दोन भागात होणार असून दि. 29 मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी 3.30 वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं.4 वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल. ही शोभायात्रा सायं .6 वा. संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ 9 पर्यंत चालेल. या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण 43 प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून 1100 असे एकूण 2100 कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. एक भारत श्रेष्ठ  भारत या संकल्पनेवार आधारित विविध सादरीकरणे भारतभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार आहेत.

या काष्ठपूजन सोहोळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनरूभारणीत अनेकांचे हात लागले आहे आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडून श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहे, अशी भावना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षिदार व्हावे, काष्ठ पूजनात सहभाग घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले आहे.

 

Web Title: Best teak wood from Maharashtra for Sri Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.