गुढीपाडव्यासाठीचा हा आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या गुढी उभारण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 09:28 PM2019-04-05T21:28:10+5:302019-04-05T21:33:48+5:30
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ दिन मानला जातो.
पुणे : चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ दिन मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळेच गुढीपूजनाला ब्रम्हध्वजपूजनही म्हटले जाते. सूर्योदयापूर्वी गुढी उभारुन सुर्यास्ताला गुढी उतरवावी, अशी माहिती वसंतराव गाडगीळ यांनी दिली. ब्रम्हाचे पूजन अर्थातच ज्ञानाचे पूजन यादिवशी केले जाते. गुढी उभारताना स्त्री-पुरुष असा कोणताही भेद मानला जात नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय पंचांगानुसार, चैत्रवर्षाच्या कालगणनेची सुरुवात शालिवाहन शकापासून झाली. शालिवाहन राजाने शकांचे दमन करुन विजय मिळवला. भारतीय पंचांग शालिवाहन शकाप्रमाणे चालते. त्यामुळेच चैत्र प्रतिपदा हा दिवस नववर्षारंभाचा दिवस मानला जातो. उत्तर भारतामध्ये कार्तिक प्रतिपदेला वर्षारंभ मानले जाते. दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चारही राज्यांमध्ये गुढीपाडव्याला ‘यूगादि’ अर्थात युगारंभ असे म्हटले जाते.
गाडगीळ म्हणाले, ‘भारतीय पंचांगाप्रमाणे, ब्रम्हध्वजपूजन असा मूळ शब्द आहे. संस्कृतचे मराठीकरण झाल्यानंतर प्रतिपदेला पाडवा हा शब्द प्रचलित झाला. तेव्हापासून गुढीपाडवा हा शब्द रुढ झाला. सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरामध्ये अर्थात सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेमध्ये गुढी उभारावी. गुढी उभारण्यापूर्वी स्रान, घरच्या देवांची पूजा आणि आई-वडिलांना नमस्कार करावा. दुपारी नैवेद्य दाखवल्यावर सूर्यास्ताला गुढी उतरवावी.
शक १९४१ चैत्र शुध्द प्रतिपदेला ६ एप्रिल २०१९ रोजी शनिवारी भारतीय नूतन संवत्सर सुरु होत आहे. या दिवशी वैधृति योग असला तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. या दिवशी नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीची पूजा करावी व पंचांगस्थ श्रीगणपतीचे पूजन करावे. या संवत्सराचे नाव विकारी असे असून या वर्षात पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी असणार आहे. त्या विषयी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या परंपरेप्रमाणे सकाळी सूर्योदयानंतर गुढी (ब्रह्मध्वज) उभी करून तिची पूजा करावी, पंचांगाची पूजा करावी व सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी परत उतरवून ठेवावी. गुढी पाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस देखील आहे. पावसाचे कमी होणारे प्रमाण पाहता आपण सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प करू या !
- मोहन दाते