शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी
By admin | Published: February 20, 2016 04:07 PM2016-02-20T16:07:07+5:302016-02-20T17:58:44+5:30
'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पुणे - दि. 20 - 'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच लोकमत आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना शिक्षण क्षेत्र तसंच त्यातील होणारे बदल यावर स्मृती इराणी यांनी दिलखुलास चर्चा करत आपली मतं व्यक्त केली.
'जगभरात भारताची ओळख निर्माण होण्यासाठी भारतीय शिक्षण क्षेत्राची स्वत:ची चांगली ओळख निर्माण व्हायला हवी, पालक आणि विद्यार्थी यांना आपल्या शिक्षण पद्धतीबाबत काय वाटते हे लक्षात घ्यायला हवे' असंही स्मृती इराणी यावेळी सांगितलं. भारतीय शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय मानांकन आणणार असल्यांचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोबतच येत्या काळात आपण भारतवाणी नावाचे अॅप्लिकेशन आणणार आहोत. ज्यामध्ये सुरुवातील 22 भारतीय भाषांचा समावेश असेल आणि त्यानंतर 100 भाषांचा समावेश केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिक्षणाबरोबर समाज आणि कुटुंबातील विद्यार्थ्यांबरोबर असणारा संवाद वाढायला हवा, मानसिक आव्हाने पेलण्यासाठी शिक्षण क्षेत्र सक्षम आहे का ? हे तपासून पाहायला हवे, शिक्षण हे केवळ पैसे मिळवणे शिकवण्यासाठी नाही तर जीवन कसे जगावे ? हे शिकवण्यासाठी असायला हवे अशी भावना स्मृती इराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केली आहे.