‘बेटिंग अॅप’ची चौकशी सुरू, ‘त्या’ सट्टेबाजांचे कनेक्शन परदेशातही; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 04:25 AM2017-09-05T04:25:14+5:302017-09-05T04:25:49+5:30
भारत आणि श्रीलंकेमध्ये होणा-या एक दिवसीय सामन्यात बेटिंगप्रकरणी सहा जणांच्या मुसक्या क्राइम ब्रांचने आवळल्या आहेत. या सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणा-या एक दिवसीय सामन्यात बेटिंगप्रकरणी सहा जणांच्या मुसक्या क्राइम ब्रांचने आवळल्या आहेत. या सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
दीपक कपूर या टोळीच्या म्होरक्यासह तरुण ठाकूर, सनी, नीतेश खेमलानी, निखिल गनत्रा आणि आनंद शर्मा या सहा जणांना बेटिंगप्रकरणी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र देशाबाहेरही या टोळीची पाळेमुळे पसरली आहेत. त्याबाबत गुन्हे शाखेचा कक्ष नऊ सध्या तपास
करत आहे. तसेच मोबाइल सीसीआरमधील क्रमांकही पडताळत संशयितांची चौकशी केली जात असल्याने पोलिसांनी ही पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत मिळालेली पोलीस कोठडी आता ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली.
शर्मा, गनत्रा आणि खेमलानी यांच्याकडे पोलिसांना एक बेटिंग अॅप सापडले आहे, त्याबाबतही चौकशी सुरू आहे. अजून काही लोकांना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.