नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बेटिंग
By admin | Published: October 23, 2014 04:22 AM2014-10-23T04:22:16+5:302014-10-23T09:09:59+5:30
बुकींनी आता नवे मुख्यमंत्री कोण, यावर बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे. यात देवेंद्र फडणवीस हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांचा दर ७२ पैसे आहे
डिप्पी वांकाणी, मुंबई
बुकींनी आता नवे मुख्यमंत्री कोण, यावर बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे. यात देवेंद्र फडणवीस हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांचा दर ७२ पैसे आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपा शिवसेनेचा पाठिंबा घेणार असल्याचेही बुकींनी घोषित केले आहे. या आठवड्याअखेरपर्यंत ८00 ते १000 कोटींचा धंदा होईल, अशी बुकींची अपेक्षा आहे.
शिवसेना-भाजपा युती संपुष्टात आल्याने जोखीम लक्षात घेत आम्ही निवडणूक काळात बेटिंग घेतली नव्हती. पण आता निकाल उघड झाले आहेत. परिणामी राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण, याबाबतचा आमचा दर आम्ही जाहीर केला आहे, असे एका बड्या बुकीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय नाव असल्याचेही या बुकीने सांगितले.
फडणवीस हे तरुण आणि तडफदार असून त्यांची प्रतिमाही चांगली आहे. त्यांच्यावर पक्षांतर्गतही कोणती टीका होत नाही. आमच्या अंदाजानुसार तेच मुख्यमंत्रिपदी येणार असल्याने आम्ही त्यांचा दर ७२ पैसे ठेवला आहे, असे या बुकीकडून सांगण्यात आले.
नितीन गडकरी यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून त्यांचा दर ३ रुपये २५ पैसे आहे. दिल्लीहून राज्यातील राजकारणात येण्यास आपण उत्सुक नसून दिल्लीतच आनंदी असल्याचे गडकरी सांगत आहेत. शिवाय त्यांच्या कंपन्यांवर आयकर खात्याचे छापे पडले होते. त्यामुळे त्यांना हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे, असे बुकीचे म्हणणे आहे.
वर्षानुवर्षे युती असलेल्या शिवसेनेसोबतच भाजपा सत्तेवर
येईल आणि राष्ट्रवादीने देऊ
केलेल्या पाठिंब्याचा केवळ सेनेशी वाटाघाटी करण्यासाठीच वापर केला जाईल. यावेळी राज्यात उपमुख्यमंत्री नसेल तसेच भाजपा केंद्रात शिवसेनेला काही मंत्रिपदे देईल, असाही बुकींचा होरा आहे.