Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत - आरोग्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 01:45 PM2021-04-22T13:45:04+5:302021-04-22T13:46:53+5:30
Corona Vaccination : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच होणार लसीकरण.
देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान, १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. तसंच लस उत्पादक कंपन्यांना एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लसी खुल्या बाजारातही विकता येणार आहेत. त्यामुळे राज्यांना आणि खासगी रुग्णालयांनाही या लसी खरेदी करण्याची मुभा असेल. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ या वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.
गरीब आणि अतिगरीब घटकांना मदत करण्यात येत असेल तर त्याचा विचार शासन स्तरावर केला जाईल. त्याबाबत नक्कीच निर्णय घेऊ. पण ज्यांना लस विकत घेणं विकत घेणं शक्य आहे, जो श्रीमंत वर्ग आहे त्यांनी ती लस विकतच घेतली पाहिजे असं स्पष्ट मत आहे, असंही ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. "आपल्याकडे स्पुटनिक, मॉडर्ना अशा काही परदेशी लसींनाच्या वापरासही मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या लसी अत्यंत महागड्या आहेत. आपल्यापेक्षा त्या लसींची किंमत ७ पट, ८ पट, १० पट जास्त आहे. आपल्याला लसी मोठ्या प्रमाणात खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याची चर्चा करण्यात येणार असून त्यांनी किंमती कमी करण्याचं मान्य केल्यास त्यांच्याकडूनही लस खरेदीचाही विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे," असं त्यांनी नमूद केलं.
सीरमच्या लसी २४ मेपर्यंत बुक
"सीरमच्या लसींचे डोस २४ मे पर्यंत केंद्र सरकारकडे बुक आहेत अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण महिना लस खरेदी करता येणार नाही. भारत बायोटेक ही सरकारी कंपनी आहे. त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी चर्चा करत आहेत. त्यांनी अद्याप राज्य सरकारांना या लसी किती रुपयांत द्यायच्या याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय एक दोन दिवसात झाल्यास त्यांना ऑर्डर देता येऊ शकतील," असंही टोपे म्हणाले. किती रुपयांत लस द्यायची कोणत्या घटकांना लस मोफत द्यायची हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेता येईल.