सावधान...! टीबीचा धोका वाढतोय : लहान मुलांमधील प्रमाण लक्षणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:00 AM2019-03-24T00:00:00+5:302019-03-24T00:00:02+5:30

अनियमित आहार, अपुरी झोप, धुम्रपान आणि व्यसनाधिनता तसेच घरातील अथवा कामाच्या ठिकाणी असलेली उजेडाची कमी, सातत्याने गर्दीमधून होणारा प्रवास, रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव आदी कारणांमुळे क्षयरोग होऊ शकतो.

Beware ...! Increasing the risk of TB : The number of children is significant | सावधान...! टीबीचा धोका वाढतोय : लहान मुलांमधील प्रमाण लक्षणीय

सावधान...! टीबीचा धोका वाढतोय : लहान मुलांमधील प्रमाण लक्षणीय

Next
ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यकपालिकेच्या ११ केंद्रांमध्ये सध्या साडेचार हजारांच्या आसपास रुग्ण केंद्र शासनाच्या योजनेनुसार टीबी रुग्णांच्या खात्यामध्ये दरमहा ५०० रुपये जमा करणे बंधनकारकनियमित उपचार आणि डॉट पध्दतीचा अवलंब केल्यास आजाराचे समुळ निर्मुलन शक्य

- लक्ष्मण मोरे - 
पुणे : शासकीय आणि निमशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न करुनही क्षयरोगाचे (टीबी) रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. पुण्यामध्ये वषार्काठी सरासरी साडेतीन हजार नागरिकांना या आजाराची बाधा होते. यातील सरासरी १२५ रुग्ण दगावतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने सार्वजनिक ठिकाणी काळजी न घेतल्याने त्याचा फैलाव होत असल्याचे चित्र असून याला परजिल्ह्यातील किंवा परराज्यामधून नागरिकांचे होणारे स्थलांतर हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. 
अनियमित आहार, अपुरी झोप, धुम्रपान आणि व्यसनाधिनता तसेच घरातील अथवा कामाच्या ठिकाणी असलेली उजेडाची कमी, सातत्याने गर्दीमधून होणारा प्रवास, रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव आदी कारणांमुळे क्षयरोग होऊ शकतो. हा आजार जडल्यानंतर रुग्ण घाबरुन जातात. मात्र, नियमित उपचार आणि डॉट पध्दतीचा अवलंब केल्यास आजाराचे समुळ निर्मुलन शक्य आहे. सध्या हा आजार होण्याचे सर्वाधिक प्रमाण कष्टकरी वर्गामध्ये असून झोपडपट्ट्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. यासोबतच मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गातही क्षयरोगाचे प्रमाण तुलनात्मदृष्ट्या समसमान असल्याचे पहायला मिळत आहे. 
पुणे शहराचा विचार करता परगावाहून रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यातील रुग्णांमुळे आजाराचा फैलाव लवकर होत आहे. लहान मुलांमध्ये (वयोगट ० ते १४) क्षयरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. पालकांनाही अनेकदा मुलांमधील या आजारपणाचा अंदाज येत नाही. त्यामुळे हा आजार बळावत जातो. यासंदर्भात पालकांनीही काळजी आणि खबरदारी बाळगणे आवश्यक असून वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करण्याची आवश्यकता आहे. 
महापालिकेकडून टीबीच्या रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. यासोबतच रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी दरमहा ५०० रुपये रुग्णांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. तर काही रुग्णांना साडेअकरा किलो पोषक धान्यही दरमहा दिले जाते. खासगी दवाखाने अनेकदा टीबी रुग्णांची माहिती दडवून ठेवत असल्याचेही समोर आले आहे. वास्तविक टीबी रुग्ण आल्यानंतर खासगी रुग्णालयांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला कळविणे बंधनकारक आहे. पालिकेच्या ११ केंद्रांमध्ये सध्या साडेचार हजारांच्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. तर १९५७ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची आरोग्य विभागाची आकडेवारी आहे.

====
केंद्र शासनाच्या योजनेनुसार टीबी रुग्णांच्या खात्यामध्ये दरमहा ५०० रुपये पोषक आहारासाठी जमा करणे बंधनकारक आहे. त्यासाठी या रुग्णांच्या बँक खात्यांची माहिती घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या ९२ टक्के रुग्णांची ही माहिती घेण्यात आलेली आहे. तर खासगी रुग्णालयात उपचार घेणाºया २१ टक्केच रुग्णांची माहिती घेण्यात आलेली आहे. पालिकेकडून गेल्या वर्षभरात टीबी रुग्णांच्या खात्यात ९६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर ४४ रुग्णांना दरमहा साडेअकरा किलो पोषक धान्य दिले जात आहे. 
====
काय आहेत आजाराची कारणे?
रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव
सातत्याने गर्दीमधून प्रवास
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकणे, शिंकणे
घर - कामाच्या ठिकाणी उजेडाचा अभाव
नागरिकांचे होणारे स्थलांतर
हवेमधून होणारा संसर्ग
====
डॉट पद्धतीचा उपचार परिणामकारक
टीबी रुग्णांना उपचार करताना डॉट पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये आजाराचे प्रमाण पाहून सहा-आठ-बारा महिन्यांपर्यंत औषधे दिली जातात. कोणत्या स्वरुपाचा टीबी झालेला आहे त्यावर कोणते उपचार द्यायचे हे ठरवले जाते. रुग्ण आल्यानंतर त्याचे सर्व प्रकारचे रेकॉर्ड ठेवले जाते. 
====
क्षयरोगाचे प्रकार
एक्स्ट्रा पल्मनरी (फुफ्फुस)
लिन्फोनोर
आतड्याचा क्षय
मेनीनजायटीस (मेंदू)
त्वचा
मणका
ओव्हरीज
गुडघा
डोळे
====
क्षयरोगाची लक्षणे
वजन कमी होत जाणे
सतत ताप येणे
सहा आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला
कणकण येत राहणे
भूक न लागणे
====
पुणे महापालिकेकडून क्षयरोगाच्या रुग्णांना उत्तम दजार्चे उपचार दिले जातात. डॉट्स तसेच अन्य उपचार पद्धतीने अनेक रुग्ण बरे झाले आहेत. केंद्र शासनाच्या योजनेचा निधी आणि पोषक धान्य रुग्णांना नियमित दिले जाते. रुग्णांनी मध्येच उपचार सोडू नयेत. त्यामध्ये खंड पडला तर रुग्णाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता असून मुलांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आजाराची लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. पालिका आणि राज्य शासनाकडून रुग्णांसाठी उत्तम प्रतीचे उपचार उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनीही त्यांच्याकडील रुग्णांची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
====
क्षयरोगाचे रुग्ण आणि उपचारांची आकडेवारी

वर्ष        रुग्ण        पूर्णपणे बरे         औषधोपचार पूर्ण        मृत्यू
2015        3776        1575            2203            153
2016        3586        1544            2042            136
2017        3319        1109            2210            127
2018        3185        आकडेवारी नाही        आकडेवारी नाही        आकडेवारी नाही
2019        1064        आकडेवारी नाही        आकडेवारी नाही        आकडेवारी नाही
=========
0 ते 14 या वयोगटातील रुग्ण
वर्ष        रुग्ण
2015        129
2016        195
2017        171
 
             


 

Web Title: Beware ...! Increasing the risk of TB : The number of children is significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.