वाहनधारकांनो सावधान; महामार्गावरुन प्रवास करताय तर फास्टॅग हवाच !
By appasaheb.patil | Published: November 7, 2019 12:33 PM2019-11-07T12:33:42+5:302019-11-07T12:40:09+5:30
चारचाकी वाहनांना फास्टॅग बसवणे अनिवार्य; एक डिसेंबर पासून पथकर नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टॅग बसवणे अनिवार्य आहे. कारण पथकर नाक्यावर एक डिसेंबर २०१९ पासून रोख रक्कमेच्या माध्यमातून पथकर स्वीकारला जाणार नाही. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी फास्टॅग बसवून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सन २०१६ पासून फास्टॅग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरु केली आहे. त्यानुसार ७ मे २०१८ रोजी केंद्र सरकारने याबाबतचे राजपत्रही जाहीर केले आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. कदम यांनी नमूद केले आहे की, फास्टॅग ही यंत्रणा सर्व पथकर नाक्यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फास्टॅग आॅनलाइन परचेस पोर्टल वरही उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर फास्टॅग अॅप्लकेशन उपलब्ध आहे.
-------------------
फास्टॅग काय आहे ?
फास्टॅग एक पातळ ईलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप वाहनांच्या दर्शनी भागात चिकटविण्यात यावी. ही चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बँक अकाऊंटला जोडता येते.
-------------
फास्टॅग कसे काम करते ?
फास्टॅग चिकटवलेले वाहन पथकर नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला पथकर वाहनधारकाच्या फास्टॅगँ अकाऊंटमधून वजा होईल.फास्टॅग ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याव्दारे फास्टॅग चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर पथकर नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि वाहनास थांबावे न लागता पुढे जाता येईल.
------------
फास्टॅग वापरण्याचे फायदे...
फास्टॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन आॅफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार दरवर्षी देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे, असेही संजय कदम यांनी स्पष्ट केले.