‘सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता नको’
By admin | Published: January 19, 2016 01:37 AM2016-01-19T01:37:49+5:302016-01-19T01:37:49+5:30
सर्वच साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात घेता येईल. मात्र, साहित्य हे कोणा व्यक्तीचे नसते. ते नका घेऊ, हे घ्या, अशी सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता कला,
पुणे : सर्वच साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात घेता येईल. मात्र, साहित्य हे कोणा व्यक्तीचे नसते. ते नका घेऊ, हे घ्या, अशी सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता कला, संगीतात येऊ नये. किमान याच क्षेत्रातील व्यक्तींनी तरी म्हणू नये, असे मत शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी येथे आयोजित ८९व्या साहित्य संमेलनातील ग्रंथदालनाला तावडे यांनी भेट दिली. संमेलनात सहभागी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. शेक्सपिअर अभ्यासायला मिळतो. मात्र, कालिदास, तुकाराम, रवींद्रनाथ टागोर अभ्यासाला मिळत नाहीत, अशी खंत गुलजार यांनी साहित्य संमेलनात व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
वाचन संस्कृतीबाबत तावडे म्हणाले, ‘‘मराठी वाचकांना पुस्तके वाचायची आहेत. गेल्या काही साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या विक्रीच्या आकडेवारीवरून ही गोष्ट स्प्ष्ट आहे.’’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत विचारले असता, तावडे म्हणाले, ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर हा मुद्दा आला आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे यासाठी रस्त्यावर येण्याची आवश्यकता नाही.’’
साहित्य संमेलनाचा निधी हा शेतकऱ्यांसाठी वळवा, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत तावडे म्हणाले, ‘‘मराठी भाषेचा, साहित्याचा हा उत्सव आहे. शासनाकडे प्राप्त झालेला निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या करातून आलेला आहे. त्यामुळे अशा संमेलनांसाठी निधी दिला पाहिजे.’’ (प्रतिनिधी)