‘परे’चे तिकीट आता मोबाइलवर
By admin | Published: July 9, 2015 02:32 AM2015-07-09T02:32:39+5:302015-07-09T03:07:10+5:30
वेळेची बचत, तिकिटांच्या रांगेतून सुटका आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकिटांचा (अनारक्षित) शुभारंभ केला.
मुंबई : वेळेची बचत, तिकिटांच्या रांगेतून सुटका आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकिटांचा (अनारक्षित) शुभारंभ केला. मुंबईतील चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयात या सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतील रेल्वे भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. या सुविधेचा लाभ घेतल्यानंतर मोबाइलवर आलेले तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच येत्या दोन महिन्यांत या सुविधेद्वारे मासिक पासही दिला जाईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
ही सुविधा केवळ सध्या पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी असणार आहे. लवकरच मध्य रेल्वेमार्गावरही ती सुरू करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत ‘यूटीएस आॅन मोबाइल’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले असून, गुगल प्ले स्टोअर किंवा विंडो स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करून घेता येणार आहे. यात प्रवाशांच्या मोबाइलवर तिकिटाचा फोटो येईल आणि त्याद्वारे प्रवास करता येईल. हे अॅप यापूर्वीच तुमच्याकडे असेल तर ते अपडेट करणे गरजेचे असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. हे अॅप विकसित केलेल्या ‘क्रिस’ या रेल्वेच्या संस्थेचे मुंबईचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले, की लवकरच पेपरलेस मासिक पासही उपलब्ध करून दिला जाणार आहे. पासचे नूतनीकरणही करता येणार असल्याचे ते म्हणाले. पासची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी कोणती माहिती देणे गरजेचे आहे, याबाबत सध्या चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)