Dhananjay Munde: "म्हणजे आम्हाला महामहिम म्हणताना अवघड वाटणार नाही!"; राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:09 PM2022-07-30T17:09:49+5:302022-07-30T17:25:15+5:30

राज्यपालांच्या विधानावर सर्वच स्तरातून नाराजीचा सूर

Bhagat Singh Koshyari Controversial Statement about Marathi Mumbai NCP Leader Dhananjay Munde slams Governor of Maharashtra | Dhananjay Munde: "म्हणजे आम्हाला महामहिम म्हणताना अवघड वाटणार नाही!"; राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

Dhananjay Munde: "म्हणजे आम्हाला महामहिम म्हणताना अवघड वाटणार नाही!"; राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

googlenewsNext

Dhananjay Munde on Koshyari Marathi Controversy: महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor of Maharashtra) भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. "कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही", असे विधान राज्यपाल कोश्यारींनी केल्याचे व्हिडीओमध्ये दिसले. त्यावर आता वाद निर्माण झाला असून असे वक्तव्य म्हणजे मुंबईचा आणि मराठी माणसाचा अपमान असल्याचा सूर नेतेमंडळींमध्ये दिसून येत आहे. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करत आपले मत मांडले.

भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातील कारकीर्द सुरूवातीपासूनच वादग्रस्त स्वरूपाची आहे. सुरूवातीला राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतभेदाच्या बातम्या चांगल्याच गाजल्या. त्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपालांनी सरकारबाबत विधान न करता मुंबई, ठाण्याबाबत विधान करत वाद ओढवून घेतला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले. "महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि त्यांचे महत्व कमी करण्याचा काही मंडळी अनावश्यक अट्टाहास करत आहेत. अशी वक्तव्ये करून मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाचा अवमान करणे संबंधितांनी बंद करून माफी मागावी, म्हणजे आम्हाला महामहिम म्हणताना अवघड वाटणार नाही!", अशा खोचक शब्दांत त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. "मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे... खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।", असे ट्वीट अजित पवार यांनी केले.

दरम्यान, "मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही", असा खुलासा राज्यपालांनी वाद निर्माण झाल्यानंतर काही वेळाने केला.

Web Title: Bhagat Singh Koshyari Controversial Statement about Marathi Mumbai NCP Leader Dhananjay Munde slams Governor of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.