राज्यपालांनी मागितलेली माफी म्हणजे मराठी माणसाचा विजय; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 10:17 PM2022-08-01T22:17:07+5:302022-08-01T22:18:34+5:30

राज्यपालांनी मराठी माणूस आणि मुंबई या संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता.

Bhagat Singh Koshyari saying sorry for controversial statement is victory for every Marathi Mumbaikar says NCP Jitendra Awhad | राज्यपालांनी मागितलेली माफी म्हणजे मराठी माणसाचा विजय; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

राज्यपालांनी मागितलेली माफी म्हणजे मराठी माणसाचा विजय; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: "रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. 105 हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल. कारण याच मनाने गुजरात्यांना स्वीकारले आहे. स्वतःचा घाम गाळून त्यांचे खिशे भरले. पण, त्याबद्दल आम्ही कधीच आसूया बाळगली नाही. आमची मनं मोठी आहेत. मला वाटते की हा मराठी माणसाचा विजय आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने आज राजभवनावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मराठी माणसाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली. याबाबत ते पत्रकारांशी बोलता होते.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "खरं तर कोश्यारी यांना आपण फार लांबचा कौल दिला होता. जेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हाच मराठी माणसाने पेटून उठायला हवे होते. जेव्हा ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई यांच्या विवाहाच्या वयाबद्दल बरळले होते. तेव्हाच आपण उठायला हवे होते. आपण न उठल्यामुळेच त्यांची मराठी माणसाला भिकारी म्हणण्याची हिंमत झाली. राजस्थानी आणि गुजराती नसते तर मराठी माणसाला कोण ओळखतो, हे त्यांचे विधान आहे. पण, त्यांना माहित असायला हवे की मराठी माणसाला सबंध जग ओळखतं. रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. १०५ हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल", असे ते म्हणाले.

"राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय असेल असे विचारले असता, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसून सबंध मराठी माणसांची होती. कोश्यारी हे आपणाला एकट्याला भिकारी म्हणाले नव्हते तर ते सर्वच मराठीजनांना भिकारी म्हणाले होते. त्यामुळे  यामध्ये पक्ष आणू नका, ही भूमिका समस्त मराठी माणसांची होती. भले सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरला नाही पण, आपण जेव्हा आंदोलनासाठी रस्त्यावर चालत होतो. तेव्हा गाडीतून जाणारा प्रत्येक माणूस मला प्रोत्साहन देत होता. कारण, कोश्यारींचे शब्द बाणासारखे मराठी मनाला टोचले होते. मराठी माणूस अस्वस्थ होता. पक्षाभिनिवेश विसरून दबावगट तयार होत होता. कदाचित त्यांना ते कळले असावे, म्हणून त्यांनी माफीनामा दिला", असेही आव्हाड म्हणाले.

Web Title: Bhagat Singh Koshyari saying sorry for controversial statement is victory for every Marathi Mumbaikar says NCP Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.