मराठ्यांच्या राजधानीत भगवं वादळ!

By admin | Published: October 3, 2016 10:33 AM2016-10-03T10:33:23+5:302016-10-03T15:05:08+5:30

‘कोपर्डी प्रकरण, आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी’सह अनेक मागण्यांसाठी मराठा समाजाचा हा मोर्चा आज साता-यात निघाला आहे. यासाठी पहाटेपासूनच जिल्ह्यातून हजारो वाहने शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली

Bhagat storm in Maratha capital | मराठ्यांच्या राजधानीत भगवं वादळ!

मराठ्यांच्या राजधानीत भगवं वादळ!

Next
ऑनलाइन लोकमत
 
सातारा, दि. 3 - तब्बल सहा किलोमीटर लांबीचा सर्वांत लांब असा महामोर्चा काढून सातारा हीच खºया अर्थानं मराठ्यांची राजधानी असल्याचा प्रत्यय 25 लाखांपेक्षाही जास्त समाज बांधवांनी आज आणून दिला. या महामोर्चामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली तर महामोर्चातील शेवटचा मावळा शहरापासून तब्बल सहा किलोमीटर लांब असलेल्या शेंद्रे गावातच थांबला होता.

पहाटेपासूनच साता-याचे सर्व रस्ते वाहनांनी हाऊसफुल्ल झाले होते. सकाळच्या प्रहरातच शाहू स्टेडियम, झेडपी मैदान अन् सैनिक स्कूल ग्राउंड मराठा समाज बांधवांच्या गर्दीने फुलून गेले होते. याठिकाणी सर्वाधिक संख्या माता भगिनींचीच होती. लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत यात सहभागी झाले होते. गेले चार दिवस जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू असल्याने आज अनेकांनी रेनकोट अन् छत्री सोबत आणली होती; मात्र ढगाळलेल्या आभाळानं आज या महामोर्चाचाही जणू आदर केला. महामोर्चा संपेपर्यंत एक थेंबही पाऊस साता-यात पडला नाही.

सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी ‘राजमाता जिजाऊ वंदना’ झाल्यानंतर महिलांपासून महामोर्चास सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात अगोदरच जमलेल्या पुरुषांनी स्वत:हून या माता-भगिनींना वाट करून दिली. त्यानंतर राधिका चौक, राजवाडा अन् कमानी हौद मार्गे हा महामोर्चा पोवई नाका येथे विसावला. यावेळी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
 
 

याठिकाणी मराठा तरुणींनी आपल्या भाषणातून वेदनांचा हुंकार प्रकट केला. त्यानंतर कोपर्डी, आरक्षण अन् अ‍ॅॅट्रॉसिटी यासह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांच्या कार्यालयात जाऊन देण्यात आले. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते पोवई नाका येथेच थांबले होते.

महामोर्चा सुरू असताना एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका चौकात आली. त्यावेळी सर्व स्वयंसेवकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. ही शिस्त, माणुसकी अन् संयम पाहून तमाम सातारकर भारावून गेले. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या महामोर्चात शेवटपर्यंत ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ होता. तब्बल चार हजार स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे केलेले कार्य पोलिस खात्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधून आलेल्या समाज बांधवांसोबत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथीलही मंडळींची या महामोर्चास साथ मिळाली.


 
महामोर्चाची गर्दी शहराबाहेरही उसळणार असल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद असून, या महामोर्चासाठी एक लेन पोलिसांनी राखीव ठेवली आहे. महामोर्चातील बांधवांसाठी सकाळपासून अनेक ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या शहरात आणल्या असून, त्याचे वाटपही सुरू झाले.

 
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग तळ बनविण्यात आले असून, महामोर्चाचा मार्गही पोलिसांनी अगोदरच जाहीर केला होता. या महामोर्चात लहान मुलांपासून दिव्यांग व्यक्तीपर्यंत सर्वच घटक सामील होत आहेत. 
कोपर्डीतील पीडित कुटुंबीय साता-यात
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील पीडित मुलीचे आई-वडील अन् भाऊ रात्रीच सातारा जिल्ह्यात दाखल झाले असून, या महामोर्चात त्यांनीही आवर्जून उपस्थिती लावली आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी या महामोर्चात सामील होण्याची घोषणा केली असून, बाकीच्या सर्व पक्षांचे नेतेही पोवई नाक्यावर जमा होत आहेत. नाशिक अन् पुणे येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केल्यामुळे साता-यात ते नेमके काय बोलणार, याकडेही सा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

Web Title: Bhagat storm in Maratha capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.