भाई वैद्य यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’
By admin | Published: March 23, 2016 01:38 AM2016-03-23T01:38:28+5:302016-03-23T01:38:28+5:30
पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत असल्याची माहिती ‘पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फळाने नांगरत असलेली प्रतिमा, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भाई वैद्य यांची निवड केली आहे. मे महिन्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्काराचे यंदाचे २८वे वर्ष आहे. पुरस्काराबरोबर सहा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये शंकर बुरुंगले, बाबूराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, दत्ता गांधी यांचा समावेश आहे.
सोशालिस्ट पार्टी (इंडिया) या पक्षासह भारत यात्रा ट्रस्ट दिल्ली, एस. एम. जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे मनपा सेवा निवृत्त संघ अशा संस्थांचे वैद्य हे अध्यक्ष आहेत. पुण्याचे महापौर, माजी गृह राज्यमंत्री, जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. वैद्य यांनी १९४२मध्ये शालेय जीवनात असताना चलेजाव चळवळीमध्ये भाग घेतला होता.