भैरप्पा, खरे यांची नाशिककरांना श्रवणपर्वणीं

By admin | Published: July 25, 2016 02:48 PM2016-07-25T14:48:29+5:302016-07-25T14:48:54+5:30

नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज संध्याकाळी नाशिककरांना प्रख्यात कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Bhairappa, Khare hear the voice of Nashikar | भैरप्पा, खरे यांची नाशिककरांना श्रवणपर्वणीं

भैरप्पा, खरे यांची नाशिककरांना श्रवणपर्वणीं

Next

सार्वजनिक वाचनालय : शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २५ - नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता नाशिककरांना प्रख्यात कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा व ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विष्णू खरे यांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सावानाने प्रथमच हा योग जुळवून आणला आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात डॉ. एस. एल. भैरप्पा ‘भारतीयत्व आणि भारतीय साहित्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर डॉ. विष्णू खरे हे ‘मी आणि माझी वाचनालये’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सावानाच्या वतीने रविवारपासून शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम सुरू आहेत.

रविवारी सकाळी डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी निमंत्रित मान्यवरांशी संवाद साधत आपला लेखनप्रवास उलगडून दाखवला. वयाच्या अकराव्या वर्षी आई गेली. त्यानंतर बहीण-भाऊ एकाच दिवशी प्लेगने मृत्यू पावले. पंधरा वर्षांचा असताना त्यांचे मृतदेह स्वत:च्या खांद्यावर वाहिले अन् मृत्यूविषयी चिंतन सुरू झाले. त्यातून तत्त्वज्ञानाकडे वळलो व लेखनाचा मार्ग सुकर झाला, असे ते म्हणाले. सन १९६२ मध्ये पीएच.डी. करीत असतानाच ‘वंश’ या विषयाने अस्वस्थ केले व कादंबरी आकार घेऊ लागली. भारतातील वंश संकल्पनेचा सखोल अभ्यास करून ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी लिहिली. त्यावर पुढे चित्रपटही आला. आपल्या या दुसऱ्या कादंबरीने आपल्याला कादंबरीकार म्हणून ओळख दिली; शिवाय आपल्यात बदलही घडवल्याचे डॉ. भैरप्पा म्हणाले.
सायंकाळी डॉ. विष्णू खरे यांची मुलाखत कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी घेतली. त्यात डॉ. खरे यांनी अनेक विषयांवर रोखठोक मते व्यक्त केली. आपल्याकडचे चेतन भगत वगैरेंसारख्या लेखकांचे साहित्य सुमार दर्जाचे आहे. ते जाळून टाकायला हवे; पण हीच पुस्तके आज बेस्ट सेलर ठरत आहेत. पाश्चात्त्य देशांत पुस्तकांच्या लाखो प्रती खपतात. आपल्याकडे काही हजार पुस्तके विकली गेली तरी ती बेस्ट सेलर ठरतात. आर. के. नारायण यांच्यासारखे लेखक मात्र खरोखर कमिटेड होते, असे यावेळी डॉ. खरे म्हणाले.
दरम्यान, आज सायंकाळी होणाऱ्या सोहळ्याला सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी आदि उपस्थित राहणार आहेत.

दिग्गजांच्या उपस्थितीची परंपरा
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या शंभराव्या वर्धापनदिनास स्वातंत्र्यवीर सावरकर, १२५व्या वर्धापनदिनाला यशवंतराव चव्हाण, तर १५० व्या वर्धापनदिनाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची उपस्थिती होती. त्याच परंपरेचे जतन करीत यंदाच्या १७५ व्या वर्धापनदिनाला डॉ. एस. एल. भैरप्पा व डॉ. विष्णू खरे या दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title: Bhairappa, Khare hear the voice of Nashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.