राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 05:21 PM2018-03-10T17:21:13+5:302018-03-10T17:58:23+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. 

bhaiyyaji joshi reelected as general secretary of rss for a period of 3 years | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड

googlenewsNext

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. जोशी यांना सलग चौथ्यांदा या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे हे विशेष. ते पुढील ३ वर्षे या पदावर कायम राहतील. २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानण्यात येत आहे.सरकार्यवाह हे पद संघा प्रमुखांनंतरचं दुसरं मोठं पद आहे. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक दर ३ वर्षांनी होते. यंदा भय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना संधी मिळते याबाबत संघ वर्तुळात उत्सुकता होती. त्यानुसार शनिवारी निवडप्रक्रिया राबविण्यात आली व जोशी यांचीच फेरनिवड झाली. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी जोशी यांची निवड झाल्याची घोषणा केली. बाळासाहेब देवरस , हो.वे शेषाद्री यांनी याअगोदर तीन हून अधिकवेळा सरकार्यवाहपदाची जबाबदारी पार पाडली आहे. जोशी रविवारी नवीन कार्यकारिणीची घोषणा करतील.



 

असा घडला क्रम
- जोशी सरकार्यवाहपदावरुन पायउतार झाले.

- निवडणूक अधिकारी म्हणून मध्य क्षेत्र संघचालक अशोक सोहनी यांच्याकडे जबाबदारी

- पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेरिया यांनी भय्याजी जोशी यांच्या नावाचा  प्रस्ताव ठेवला. त्यांनी भय्याजी यांच्या कार्यकाळात संघाच्या प्रगतीचा उल्लेख केला .

- पूर्व उत्तर प्रदेश संघचालक वीरेंद्र पराक्रमादित्य, दक्षिण प्रांताचे कार्यवाह राजेंद्रन,  कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे, आसाम क्षेत्र कार्यवाह डॉ.उमेश चक्रवर्ती यांचे जोशींच्या नावाला अनुमोदन

- अ.भा.प्रतिनिधी सभेत जोशी यांची एकमताने निवड

जोशींना मिळाला अनुभवाचा फायदा

यंदा जोशी यांच्यासोबतच सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे नावदेखील चर्चेत होते. परंतु संघश्रेष्ठींचा कल जोशी यांच्याकडेच होता. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या प्रचारात सक्रिय भुमिका पार पाडली होती. यात भय्याजी जोशी यांनी संपूर्ण रणनिती आखली होती व त्यांच्याच प्रयत्नांमुळे भाजपाला ‘न भुतो न भविष्यति’ असे यश मिळण्यास मदत झाली होती. शिवाय जोशी यांच्या कार्यकाळात संघाचा विस्तारदेखील झाला. उत्तरप्रदेशसह ईशान्येत त्यांच्या कार्यकाळात संघकार्यात वाढ झाली. २०१२ साली जोशी यांनी दुसºयांदा सरकार्यवाहपदाची सूत्रे घेतल्यापासून सहा वर्षात संघाच्या शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली.  त्यामुळे जोशी यांच्या अनुभवावरच संघाच्या प्रतिनिधींनी विश्वास टाकला व त्यांना परत एकदा सरकार्यवाहपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली.

प्रचारक ते सरकार्यवाहपदाचा चौकार

सरकार्यवाह भय्याजी जोशी हे मूळचे इंदूरचे असून त्यांचा जन्म १९४७ सालचा आहे. जोशी यांनी ठाणे या शहरात शिक्षण पूर्ण करत कला शाखेची पदवी संपादन केली. ते कलाशाखेचे पदवीधर आहेत. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या भैय्याजी जोशी यांची १९७५ साली प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी देशातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये संघविस्ताराचे काम केले. यादरम्यान महाराष्ट्रात जिल्हा विभाग प्रचारक, प्रांत सेवा प्रमुख, क्षेत्र सेवा प्रमुख, अखिल भारतीय सहसेवा प्रमुख, अखिल भारतीय सेवा प्रमुख, सह-सरकार्यवाह अशा विविध जबाबदाºया त्यांनी पार पाडल्या. मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. २०१२ व २०१५ सालीदेखील त्यांची एकमताने निवड झाली. विधायक सेवा कार्य करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संघटनकौशल्य, प्रशासकीय हातोटी व नियोजन यामुळे संघकार्याचा देशभरात विस्तार झाला आहे. 

Web Title: bhaiyyaji joshi reelected as general secretary of rss for a period of 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.