CAA:आपण पाकिस्तान होत चाललो आहोत: भालचंद्र नेमाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:51 PM2019-12-29T14:51:45+5:302019-12-29T14:51:52+5:30
एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले.
मुंबई: देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याला प्रचंड विरोध होत असून ठीक-ठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर बऱ्याच राज्यात या आंदोलना हिंसक वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यांनतर आता याच मुद्यावरून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं असल्याचं अप्रत्यक्ष विधान केलं आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेमाडे म्हणाले की, 'हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.” असे भालचंद्र नेमाडे यावेळी म्हणाले.
एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले. तर वेगवेगळ्या नियतीने आपल्या देशात अनेक प्रकाराची लोकं येत असतात. त्यामुळे सर्वांची नियत सारखीच असेल असे म्हणता येणार नाही. तर ज्यांना भारत देशात राहणे पसंद असेल आणि त्यांना यायचं असेल तर त्यांना येऊ द्या, असे नेमाडे म्हणाले.
तर सरकराची मोठी यंत्रणा असून त्यावर मोठ्याप्रमाणावर खर्च सुद्धा करण्यात येते. त्यामुळे देशाला नुकसान पोहचवणारे लोकं कोण आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम सरकारचे आहे. मात्र एखांद्या सामान्य नागरिकाला देशाचा नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नसल्याचे सुद्धा भालचंद्र नेमाडे म्हणाले.