Bhandara Fire : निष्पाप बालकांची ही हत्या, याला महाराष्ट्र सरकार जबाबदार - राम कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 11:18 AM2021-01-09T11:18:16+5:302021-01-09T11:19:17+5:30
Bhandara Fire: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा दहा निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हत्या आहे, असा आरोप भाजपाचे नेते राम कदम यांनी केला आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत भाजपाचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.
दुसरीकडे, भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त करत या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.