हायकमांडशी बोलूनच भंडारा-गोंदियात लढायचे की नाही ठरवू- नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 04:39 PM2018-05-05T16:39:30+5:302018-05-05T16:39:30+5:30
भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असेही पटेल यांनी म्हटले होते.
मुंबई: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरले, अशी घोषणा प्रफुल्ल पटेल आज गोंदियातील पत्रकार परिषदेत केली. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असेही पटेल यांनी सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसने अजूनपर्यंत या जागेवरील दावा सोडला नसल्याचे सांगितले. मी पाच वाजता राहुल गांधींची भेट घेणार आहे. त्यावेळी हायकमांड जो आदेश देतील, तो मला मान्य असेल. तसेच प्रथम या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाल्याचे जाहीर होऊ दे. त्यानंतर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, हे मिळून ठरवू असे पटोले यांनी म्हटले. आम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद निर्माण करायचे नाहीत. निवडणूक कुणीही लढवली तरी भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र लढू, अशी सामंजस्याची भूमिका यावेळी नाना पटोले यांनी मांडली.
यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने नुकतीच विधानपरिषद निवडणुकांसाठी युती केली होती. दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला होता. त्यानुसार अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल. तर लातूर, कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे.