“उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात”; विदर्भातील आमदाराचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:05 AM2024-03-25T11:05:50+5:302024-03-25T11:06:07+5:30
MLA Narendra Bhondekar: हाच खरा चेहरा उद्धव ठाकरेंचा आहे. विदर्भातील जागा विकून मुंबईचे भले करून घेतात. मुंबईत हवी तशी सीट मागून घेतात, असा मोठा आरोप करण्यात आला आहे.
MLA Narendra Bhondekar: महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित होत नसताना महायुतीतील घडामोडींना वेग आला. जागावाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दुसरीकडे, बारामतीतून लोकसभा लढविण्याच्या निर्णयावर विजय शिवतारे ठाम आहेत. यातच आता विदर्भातील एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत मोठे आरोप केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाकडून सातत्याने विदर्भावर अन्याय केला जात आहे. आम्हाला अनेकदा अनुभव आला आहे की, पूर्वी भाजपासोबत शिवसेनेची युती होती, तेव्हा भाजपा म्हणेल तसे ते सीट द्यायचे आणि सीट घ्यायचे. आताही आपण पाहिले तर, रामटेक ही सीट शिवसेनेची पारंपरिक सीट आहे. शिवसैनिकांना न्याय द्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंनी ती सीट लढवायला हवी होती. मात्र, रामटेकची सीट काँग्रेसला देऊन टाकली. पूर्व विदर्भात एकही सीट ठेवलेली नाही. सर्व सीट देऊन टाकल्या, असा मोठा दावा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला.
उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात
मागील २०१९ च्या निवडणुकीत असाच अनुभव आम्हाला आला होता. एकही सीट आम्हाला ठेवली नाही. एक ते दोन सीट घेतल्या, त्याही एक्सपायरी डेटच्या होत्या. भाजप जे जे म्हणेल, तसे उद्धव ठाकरे करायचे. आता काँग्रेस जे म्हणतेय, तसेच उद्धव ठाकरे वागत आहेत. हाच खरा चेहरा उद्धव ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात. विदर्भातील जागा विकून मुंबईचे भले करून घेतात. मुंबईमध्ये त्यांना हवी तशी सीट मागून घेतात. हा शिवसैनिकावर अन्याय आहे, असा मोठा आरोप नरेंद्र भोंडकर यांनी केला.
दरम्यान, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी ठाकरे गटाला सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडात शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनीही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश होता. निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मदत केल्याचे बोलले जाते.