भांडारकर प्रकरणी प्रीती जैनचे अपील हायकोर्टाने करून घेतले दाखल
By admin | Published: June 8, 2017 06:39 AM2017-06-08T06:39:30+5:302017-06-08T06:39:30+5:30
मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉॅलिवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने तिचे अपील दाखल करून घेत, तिची जामिनावर सुटका केली.
२८ एप्रिल रोजी सत्र न्यायालयाने प्रीती जैन व अन्य दोघांना मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल व कट रचल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच दिवशी न्यायाधीशांनी प्रीती जैनचा चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. बुधवारी उच्च न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर तिचा जामीन मंजूर केला. तसेच अपीलही दाखल करून घेतले.
२००४मध्ये प्रीतीने मधुर भांडारकरविरुद्ध बलात्काराची केस नोंदवली होती. भांडारकरने सर्व आरोप नाकारत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही त्याच्यावरील केस रद्द केली. २००५मध्ये प्रीतीला भांडारकरच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. भांडारकरच्या हत्येसाठी अखिल भारतीय सेनेच्या नरेश परदेशीला दिलेले पैसे परत घेण्यासाठी प्रीती गेली असता हा कट उघडकीस आला.