भंडा-यात न्हाली पालनगरी!
By admin | Published: January 10, 2017 07:08 PM2017-01-10T19:08:56+5:302017-01-10T19:12:14+5:30
‘यळकोट यळकोट जय मल्हार... सदानंदाचा यळकोट...’च्या गजरात श्री खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा सहा ते सात लाख भाविकांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर शाही थाटात
Next
>ऑनलाइन लोकमत
उंब्रज (सातारा), दि. 10 - ‘यळकोट यळकोट जय मल्हार... सदानंदाचा यळकोट...’च्या गजरात श्री खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा सहा ते सात लाख भाविकांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर शाही थाटात पार पडला. यावेळी भंडा-याची उधळण केल्याने पालनगरी अवघी न्हाऊन निघाली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असणा-या क-हाड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या विवाह सोहळ्याकरिता मंगळवारी राज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. भंडा-याच्या उधळणीने श्री खंडोबाची पालनगरी पिवळी धमक झाली होती. दुपारी श्री खंडोबा देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील देवस्थानच्या रथामध्ये आसनस्थ झाले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली.
या रथाबरोबर देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी, व-हाडी मंडळी, कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडा, मानाच्या सासनकाठ्या, पालखी आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक मंदिरात आल्यानंतर मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी श्री खंडोबा आणि म्हाळसा यांच्या मूर्तींची पूजा करून सर्व मानकºयांच्या उपस्थितीत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथामध्ये बसल्यानंतर लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असणा-या भाविकांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ च्या गजरात भंडारा, खोब-याची उधळण केली.
फुलांनी सजविलेल्या रथातून श्री खंडोबा आणि म्हाळसा यांची शाही मिरवणूक मंदिरातून बाहेर पडत हळूहळू पुढे सरकत दक्षिण दिशेकडील तारळी नदीपात्रातील वाळवंटात जाऊ लागली. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी चहू बाजूंनी ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं.. यळकोट यळकोट जय मल्हार..’ च्या गजरात भंडारा, खोब-याची उधळण करत श्री खंडोबा आणि म्हाळसा यांची रथातून निघालेली शाही मिरवणूक याची देही याची डोळा अनुभवली.