भार्इंचं भोजन... अन् पंतांचा मुक्काम! --सुपरहिट
By admin | Published: May 24, 2015 11:12 PM2015-05-24T23:12:25+5:302015-05-25T00:43:35+5:30
सातारा में बीजेपी कहाँ है पंत....? त्याचाच तर शोध घेतोय भाईसाब... सातारा --0
सातारा राजधानीत राजकीय पातळीवर काहीतरी वेगळंच घडतंय, याची कुणकूण लागताच इंद्रदरबारात कुजबूज सुरू झाली. देवाधिराजांनी तत्काळ नारद मुनींना पाचारण केलं. पायातलं नवंकोरं वहाण कर्रऽऽ कर्रऽऽ वाजवत मुनी दरबारात दाखल झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या हातात विणेसोबत चक्क गूळही होता. कपाळावर आठ्या पाडून देवाधिराजांनी विचारलं, ‘आता हे काय नवीनच मुनीऽऽ?’ तेव्हा तोंडातील गावरान कोल्हापुरी गुळाचा खडा संपवत नारद लवून उत्तरले, ‘क्षमा असावी महाराज.. काल कोल्हापुरात गेलो होतो भाजपच्या बैठकीला. तिथं गूळ अन् कोल्हापुरी चपला भेट मिळाल्या. मग म्हटलं; नंतर जरा भर उन्हाळ्यातला थंडगार पन्हाळा-बिन्हाळा पाहावा. कोयनेच्या तुडुुंब पाण्यातही मनसोक्त भिजावं, पण दरबारात तत्काळ हजर होण्याचा तुमचा आदेश मिळताच तडक आलो. आहे तस्सा! बोला महाराजऽऽ काय हुकूम?’ ‘साताऱ्याच्या राजधानीत म्हणे गेल्या दोन दिवसांपासून काहीतरी जगावेगळं घडतंय. त्याची काय खबरबात?’ देवाधिराजांनी तिरकस प्रश्न विचारताच नारदमुनी चक्रावले. कारण ‘सातारा-फलटणचे राजे’ बॅँकेत संचालक बनल्यापासून पुरते चिडीचूप झाले होते. पाटण खोऱ्यात ‘शंभूराज अन् विक्रमसिंहदादा’ही भांडून-भांडून थकले होते. ‘शेखर-जयकुमार’ तर खर्च करून-करून पाऽऽर दमले होते. त्यामुळं डोक्याला ताण देऊनही संदर्भ काही त्यांच्या लक्षात येईना. नारदांची ही अनभिज्ञता पाहून अनेकांना हसू फुटलं. आता त्याचं कारणही तसंच होतं. साताऱ्यात ‘घडतंय तसं नसतंय..अन् जे दिसत नाही तेच घडत असतंय’ यावर अनेकांचा विश्वास होता. शेवटी दरबारातील मेनकेनंच त्यांना हिंट दिली, ‘गेल्या दोन दिवसांपासून म्हणे सातारा जिल्ह्यात पंत अन् भार्इंची वर्दळ वाढलीय.’ तरीही नारदमुनी गोंधळातच; कारण या टापूत ‘राजे, दादा, भाऊ अन् आबा’ हीच नावं नेहमी चर्चेत असतात, हे त्यांना आजपावेतो ठावूक होतं. केवळ यांच्याच नावाचा गवगवा कानावर पडत आला होता. ‘आता हे पंत अन् भाई कोण?’ त्यांनी विचारलं. नारदांच्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहून अप्सराही गालातल्या गालात हसत पुढं सरसावली,‘ पंत म्हणजे नागपूरचे देवेंद्रपंत.. अन् भाई म्हणजे गुजरातचे अमितभाई. आलं का लक्षात मुनीऽऽ?’ हे ऐकताच नारद चमकले. जेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांना नितांत गरज होती, तेव्हा विधानसभा निवडणुकीत ही बडी नेते मंडळी साताऱ्याकडं ढुंकूनही न पाहता सांगली-कोल्हापूरच्या दिशेनं पळत होती. निकालाच्या दिवशी अवघ्या राज्यात पक्षाचा डंका वाजत असताना साताऱ्यात मात्र पार्टी पुरती भुईसपाट झाली होती... अन् आता वेळ निघून गेल्यानंतर रिकाम्या-फाटक्या बारदान्याला जादुची पोतडी समजून जणू ठिगळं लावायला निघाली होती. असो. मुनींनी क्षणभर डोळे बंद केले. साताऱ्यातल्या साऱ्या घटना तत्काळ त्यांच्या मनचक्षूसमोर तरळून गेल्या. काँग्रेसचे सुनील काटकर राष्ट्रवादीच्या उदयनराजेंसाठी भाजपच्या अमितभार्इंचं कसं स्वागत करत होते, हे त्यांनी नीट बघितलंं. अवघ्या जिल्ह्यात ‘पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दुष्काळ’ असतानाही देवेंद्रपंत माण-खटावमधील ‘जलयुक्त शिवाराचा सुकाळ’ बघून कसं खूश झाले होते, हेही त्यांच्या लक्षात आलं. काही क्षणांनंतर डोळे उघडून ते मिश्किलपणे हसले. त्यांना काहीतरी गुप्त माहिती मिळाली असावी, हे लक्षात येताच देवाधिराजांनी उत्सुकतेनं विचारलं, ‘मग काही ब्रेकिंग न्यूज देताय की काय.. भाई-पंतांच्या सातारी दौऱ्यातली?,’ नारद हळूच खुसखुसले, ‘होय महाराऽऽज... त्या दोघांच्या खासगी बैठकीत कार्यकर्त्यांसोबत जो गुप्त संवाद झाला, तो माझ्याकडे पुरता रेकॉर्ड झालाय. ही पहा त्याचीच लाईव्ह चित्रफीत.’ तर वाचकहो.. वास्तवावर आधारीत परंतु काल्पनिक अशा या भन्नाट संवादाचा हाच तो जश्शाऽऽचा तस्साऽऽ भाग आपल्यासमोर सादर... * प्रसंग पहिला :- सर्किटहाऊसमध्ये जैन डिशेसवर भरपेट ताव मारल्यानंतर दाढी कुरवाळत अमितभार्इंनी भरतरावांना विचारलं, ‘केम छे... या जिल्ह्यात आपली ताकद किती?’ भरतरावांनी मोठ्या कौतुकानं सांगितलं, ‘ताकद भरपूर भाईसाब. प्रत्येक नेत्याकडं गाडी आहे. बंगला आहे.’ तेव्हा बाहेर उभारलेल्या सर्व तगडया नेत्यांकडं समाधानानं नजर टाकत भार्इंचा पुढचा प्रश्न, ‘बहु सरस छे. नेते एवढे वजनदार असतील तर कार्यकर्र्तेही खूपच तगडे असणार की आपले. कुठायंत कार्यकर्ते.. बोलवा त्यांना !’ तेव्हा मात्र भरतराव गडबडले. ‘पेंढारकर अन् वास्के’ या दोन आपल्या लाडक्या सहकाऱ्यांकडं बघत ते हळूच पुटपुटले,‘ इथं कार्यकर्तेच नेते बनलेत. त्यामुळं व्यासपीठावर पायधूळ झाडायला सारे तयार; पण सतरंजी उचलायला कुणीच नाही भाईऽऽ!’ हे ऐकून अमितभाई अस्वस्थ झाले, ‘अरे शु चालू छे.. अगर ऐसा हैं तो मैं सातारके राजासाबसे दिल्ली में बात करुंगा.. उनके माध्यमसे यहाँ मेरी पार्टी बडी करुंगा!’.. तेव्हा पाटलांच्या निशांतनी हळूच मोडक्या-तोडक्या हिंदीत सातारी बॉम्ब टाकला,‘ एैसा कैसा करेंगे.. क्योंकी हमारे राजे तो पार्टी के नाम पे अपने आदमींकोच बडा करते हंै... किसी पार्टी को नै. आजतक का इतिहास है ऐसा !’ * प्रसंग दुसरा :- मग मात्र संतप्त अमितभाई राजधानी सोडून तणतणत निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्रपंत सातारा मुक्कामी आले. ‘माण-खटाव’च्या दुष्काळी उन्हाचे चटके बसल्यानं त्यांचा चेहरा थोडा रापला होता. विदर्भापेक्षाही मोठ्ठं ‘दुष्काळी दु:ख’ पश्चिम महाराष्ट्रात असू शकतं, याची जाणीव झाल्यानं त्यांना आश्चर्याचा धक्काही बसला होता. सर्किटहाऊसवर त्यांच्यासोबत एक वकील अन् दोन डॉक्टर होते. म्हणजे ‘भरत वकील, दिलीप डॉक्टर अन् अतुल डॉक्टर’ होऽऽ. संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या पंतांनी विचारलं, ‘जिल्ह्यात तुमच्या ताब्यात संस्था किती?’ तिघांनी हळूच एकमेकांकडं बघितलं. दिलीपरावांनी सांगितलं, ‘माझ्या ताब्यात एक पतसंस्था होती. ती बंद पडली!’ अतुलबाबांनी उत्तर दिलं, ‘पूर्वी आमच्या हक्काचा कारखाना होता. मात्र, पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललाय.’ भरत वकीलही डोकं खाजवत हळूच पुटपुटले, ‘माझी पण वांग व्हॅलीत संस्था होती. तिचे अवशेष मात्र आजही डोंगरावर शाबूत आहेत.’ तेव्हा अस्वस्थ पंतांनी जिल्ह्यातल्या एकेका संस्थेचं नाव घेत आपल्या पक्षाची ताकद विचारली; मात्र प्रत्येक प्रश्नाला ‘नन्नाचाच पाढा’ वाचला जाऊ लागला. ‘झेडपी?.. नाही. डीसीसी?.. नाही. पंचायत समिती?.. नाही. ग्रामपंचायत?.. नाही. पाणी वाटप संस्था?.. नाही. एखादीतरी दूध सोसायटी?.. ती पण नाही.’ शेवटी पंतांनी चिडून विचारलं, ‘मग इथं आपल्या पक्षात आहे तरी काय?’ तेव्हा कोपऱ्यात उभारलेले दत्ताजीराव, सुवर्णाताई अन् पवारांचे रवी झटकन् पुढं सरसावून एकसुरात उत्तरले, ‘गटबाजी साहेब!’
सचिन जवळकोटे