भन्साळींनी 'पद्मावती'साठी रात्रीची सुरक्षा नाकारली होती
By admin | Published: March 15, 2017 11:14 PM2017-03-15T23:14:23+5:302017-03-16T01:50:23+5:30
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता, असे राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
कोल्हापुरातील पन्हाळगडावरील मसाई पठारावर 'पद्मावती' या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत काही अज्ञातांनी सेटला मंगळवारी रात्री आग लावली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
याप्रकरणी दीपक केसरकर म्हणाले की, संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सुरक्षतेसाठी दिवसा एका पोलीस अधिका-यासह पाच हवालदार देण्यात आले होते. मात्र, सेटची जाळपोळ केल्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता एका पोलीस अधिका-यासह 12 हवालदार असणार आहेत.
यापूर्वीही जयपूरमध्ये 'पद्मावती' सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी या सिनेमाच्या सेटवर तोडफोड करून संजय लीली भन्साळी यांना मारहाण सुद्धा केली होती.
तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शिशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर 'पद्मावती'चे चित्रीकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली होती. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शिशमहालातील आरसेही फोडले होते. या घटनेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले होते.