Uddhav Thackeray : "भाजपाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 20:49 IST2024-03-17T20:36:56+5:302024-03-17T20:49:57+5:30
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray : "भाजपाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली असून शिवाजी पार्कवर जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देत आहेत. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजपाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आज हुकुमशाहीला तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडलं त्यासाठी राहुल गांधींचे ठाकरेंनी आभार मानले आहेत. "भाजपा एक फुगा आहे. त्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं होतं. पण आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. रशियात निवडणूका सुरू आहेत. पण तिथे पुतीनचे विरोधक कुणीच नाहीत."
महाविकास आघाडी जाहिर सभा । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवतीर्थ, दादर - #LIVEhttps://t.co/HQ2SU6n5q0
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 17, 2024
"जे विरोधक होते, ते तुरुंगात होते. काहींना तडीपार केलं आहे. दाखवतात असं की मी लोकशाही मानतो पण माझ्या समोरच कुणी नाही. तशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे. देश हाच माझा धर्म आहे. देश वाचला तर आपण वाचू. आपली ओळख, व्यक्तीची ओळख देश असली पाहिजे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. हुकूमशाह केवढाही मोठा असला तरी त्याचा अंत होतोच."
"तोडा फोडा आणि राज्य करा असा जर इतिहास असेल. जो आपल्यात फूट पाडतोय त्यालाच तोडा फोडा व त्याच्या छाताडावर पाय देऊन राज्य करा. शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फुंकलं जातं. हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग फुकायचं आहे. लोकशाही रक्षणाची आजपासून लढाई सुरू होत आहे. तुम्ही कितीही अत्याचार करा. तुम्हाला तोडून, मोडून राहिल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.