भरत गोगवलेंची जीभ घसरली अन् मविआला पुन्हा बळं मिळालं; पाहा नेमकं काय झालं..?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:26 PM2023-03-01T14:26:02+5:302023-03-01T14:27:02+5:30
खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी केली. यासाठी भाजपचे सर्व आमदार एकवटले आणि हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी सभागृह डोक्यावर घेतले. भाजपचे आमदार एकापाठोपाठ एक संजय राऊत यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करत होते. पण, यावेळी भरत गोगावले यांनी वापरलेल्या एका शब्दाने भाजपच्या मेहनतीवर पाणी फेरले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलण्यासाठी एकेक करत भाजप आमदार आपली बाजू मांडत होते. यादरम्यान शिंदे गटाचे नेते भरत गोगावले उठले आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. यावेळी गोगावले यांनी सभागृहात असंसदीय शब्दाचा उल्लेख केला. त्यांनी तो शब्द उच्चारताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी प्रत्युत्तरात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
काय म्हणाले भरत गोगावले?
संजय राऊतांनी विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, ती मर्यादा ओलांडल्यानंतर 'अती तेथे माती' होते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे. या माणसाला विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाने इतकंही ***** नसलं पाहिजे. त्यामूळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणा,' असं भरत गोगावले म्हणाले. भरत गोगावेलेंच्या त्या शब्दानंतर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले.
यावेली ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर उठले आणि गोगावले यांच्या शब्दाचा समाचार घेतला. बाहेर बोलल्या गेलेल्या गोष्टी सभागृहात काढतात, मग इकडे त्यांनी जो आक्षेपार्ह शब्द वापरला, तो मागे घेतले पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं वक्तव्य तपासून घेऊ, असं म्हणत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला.