‘भारतमाते’चा पोरखेळ सुरू आहे का?
By admin | Published: April 11, 2016 01:47 AM2016-04-11T01:47:53+5:302016-04-11T01:47:53+5:30
‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे.
मुंबई : ‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे. आता तुम्हाला भारतमाता दिसते का? भारतमातेवर आक्रमणे झाली तेव्हा तुम्ही कुठे होता? शुद्र आणि स्त्रियांनी हा देश टिकवला आहे; आणि आता तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवता?, असा हल्लाबोल ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी प्रस्थापितांवर केला.
राजकीय व्यक्तींना फसवेगिरी करता येत नाही. फसवेगिरी केली की ‘अच्छे दिन’च्या गोष्टी कराव्या लागतात, अशी खिल्लीही त्यांनी मोदी सरकारचा उल्लेख न करता उडविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर रविवारी चर्चासत्र झाले.
राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. सुरेश माने यांनी बाबासाहेबांना आपण जाणून घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. आपल्याकडे आंबेडकर मॉडेल स्वीकारणारे लोक खूप आहेत. परंतु ते अंमलात आणणारे लोक कमी आहेत. एकट्या ‘बुद्धीझम’ने आदर्श समाज निर्माण होईल का?, यावर चिंतन आणि मनन होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी २०१६ मध्येही जात टिकून असल्याबाबत खंत व्यक्त केली.
एम. एस. बहेल यांनी शिक्षण घेऊन माणूस मोठा होणार नाही, असे सांगत विचार बदलण्याचे आणि कृती करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी तरुणांना वैचारिक वाद घालण्याऐवजी कृतीशील होण्याचे आवाहन केले. आयकर प्राधिकरणाचे
आयुक्त सुबचन राम यांनी आदर्शवाद आणि विचार यात फरक
असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आधी बहुजन समाजाची व्याख्या निश्चित करा, तरच आपण शासन करू. अन्यथा आपण भावनाप्रधान असल्याने आपला ‘जय भीम, जय भीम’ बोलून वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. लंडनमधील उद्योजक एम.एस. बहेल, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)